भांडुप पश्चिम प्रभाग ११६ची पाटीलकी कोणाकडे?, महापालिकेत सरशी कोणाची : आज ठरणार शिवसेनेच्या सत्तेचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:00 AM2017-10-12T03:00:35+5:302017-10-12T03:00:44+5:30
भांडुप प्रभाग क्रमांक ११६च्या पोटनिवडणुकीने जवळपास समान तुल्यबळ असलेल्या भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याची संधी मिळवून दिली आहे, तर आपली प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी शिवसेनेनेही सर्व शक्ती पणाला लावली आहे.
मुंबई : भांडुप प्रभाग क्रमांक ११६च्या पोटनिवडणुकीने जवळपास समान तुल्यबळ असलेल्या भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याची संधी मिळवून दिली आहे, तर आपली प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी शिवसेनेनेही सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडाच भांडुपमध्ये रंगल्याचे चित्र आज दिसून आले. मतदानाच्या दिवशी आज उभय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मात्र, सत्ताधाºयांचे टेन्शन वाढविणाºया या पोटनिवडणुकीत पहारेकरी बाजी मारतात का? याचा निकाल उद्या लागणार आहे.
काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११६ मध्ये रिक्त झालेले नगरसेवकपद भरण्यासाठी आज मतदान झाले. भाजपाने ही जागा मिळविण्यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे दोन पाटलांमध्येच या प्रभागात रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उभय पक्षांचे बडे नेतेच प्रभागात तळ ठोकून होते. यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.
या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्येच दिसून आली. आपल्या जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती, परंतु मतदारांमध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५०.६४ टक्के मतदान झाले.