Join us

बेलगाम बांधकामांची जबाबदारी कोणाकडे..?

By अतुल कुलकर्णी | Published: September 13, 2023 7:52 AM

चंदिगड शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. औरंगाबाद, नवी मुंबईचे उत्तम नियोजन सिडको करू शकते. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी ठाण्यामध्ये उत्तम विकास कामे करून दाखवतात. मग आमचा नियोजनबद्ध विकास कोण करणार?, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

- अतुल कुलकर्णी मुंबई - सिडकोने नियोजनबद्ध शहर वसवता येते, हे नवी मुंबईच्या रुपाने दाखवून दिले. मात्र शिळफाटा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागात सुरू असलेले नवे प्रकल्प, होणाऱ्या घरांची संख्या या पार्श्वभूमीवर तेथे असलेल्या सोयी सुविधा, रस्ते, पाणी, मैदान, उद्यान, वाहतुकीची साधने ठाणे जिल्ह्यासह पालघर, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणावर होत असलेली घरे... ही चौफेर वाढ होताना कसलेही नियोजन नाही. नवी मुंबईत करंजाडे रोड, नयना, नेरे, पळस्पे, एमआयडीसी हद्दीतील गावे, तळोजाच्या दोन फेज मध्ये झालेली घरे व त्यांना पडलेला नागरी समस्यांचा विळखा, खारघर भागात प्राथमिक सुविधा नसणे, रोडपाली, कळंबोली या परिसरात होणारी नागरी वाढ आणि समस्यांचे डोंगर याचा कसलाही विचार कोणत्या यंत्रणेकडे असल्याचे दिसत नाही.

चंदिगड शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. औरंगाबाद, नवी मुंबईचे उत्तम नियोजन सिडको करू शकते. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी ठाण्यामध्ये उत्तम विकास कामे करून दाखवतात. मग आमचा नियोजनबद्ध विकास कोण करणार?, असा प्रश्न लोक विचारत आहेत. लोकांच्या गरजा आणि सोयी यांचा विचार न करता ही शहरे हातपाय पसरत आहेत. सीआरझेडची मर्यादा ५० मीटरपर्यंत आणून ठेवली आहे. त्यातून भविष्यात येणारे प्रश्न भीषण असतील. बांधकाम क्षेत्रात सुरू झालेल्या माफियागिरीमुळे दाद तरी कोणाकडे मागायची, हा प्रश्न घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना आहे.

मुंबईत पाय ठेवायला जागा नाही. नवी मुंबईत परदेशी नागरिकांनी ठिकठिकाणी उघडलेले ड्रग्जचे अड्डे, वाढती गुन्हेगारी, पालघरसारख्या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधा नसणे, रायगड जिल्ह्यात बाहेरून आलेल्या बड्या लोकांसाठी सोयी-सुविधा एकीकडे तर वस्ती, वाडे, तांड्यांवर त्यांचा मागमूस नसणे हा मोठा विरोधाभास एमएमआरडीए परिसरात निर्माण झाला आहे. उद्याच्या अंकात :  बिल्डरांनी जमिनी बळकावल्या,  मिळालेल्या टीडीआरला कोणी विचारेनाया व अशा असंख्य विषयांना स्पर्श करणारी ‘स्फोटक महानगर’ ही विशेष मालिका आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. या मालिकेच्या अनुषंगाने आपले प्रश्न, एखाद्या बिल्डरने आपल्याला फसवले असेल, तक्रार करूनही दाद मिळत नसेल किंवा परिसरातल्या समस्यांबद्दल सांगूनही उत्तरे मिळत नसतील, तर असे प्रश्न आपण आम्हाला पाठवू शकता. आमची टीम आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. lokmatmumbai1@gmail.com या ईमेल वर आम्हाला कळवा. 

टॅग्स :मुंबई