Join us

कोण आहे अनिल जयसिंघानी, जाणून घ्या का पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या होता रडारवर?

By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2023 1:22 PM

मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस उपायुक्त अमर जाधव यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपांमुळे तो चर्चेत आला होता.

मुंबई : आंतराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी हा मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस उपायुक्त अमर जाधव यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. त्याच्या आरोपांमुळे जाधव यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची वेळ आली होती. त्याच्या विरोधात १४ ते १५ गुन्हे दाखल असून तो गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फरार होता. अखेर, तो गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे.

जयसिंघानी हा सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतला होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. जयसिंघानी याची मुलगी अनीक्षा २०१५ -१६ मध्येही अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. त्यानंतर, तिच्याशी पूर्णत: संपर्क तुटला. अनिक्षा ही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ती उच्च शिक्षित आहे.

२०१५ मध्ये जयसिंघानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या उल्हासनगर येथील घरात छापा कारवाई केली होती. यावेळी मोठे नेटवर्क ईडीच्या हाती लागले. याप्रकरणात तब्येतीचे कारण पुढे त्याने उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईतील साकीनाका आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत, अहमदाबाद कोर्टानेही त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वारंट जारी केले होते. यावेळी देखील त्याने आजारी पाडण्याचे नाटक केले होते. त्यानंतर, बायकोच्या शस्त्रक्रियेसंबंधित बनावट कागदपत्रेही सादर केले होते. ईडी अधिलकार्यांसह मुंबई, ठाणे, गोवा, आसाम, गुजरात आणि मध्यप्रदेश पोलीस त्याचा शोध घेत आहे.

आरोपीला पकडण्यासाठी बॅनर्स२०१८ मध्ये आझाद मैदान पोलीस दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, आझाद मैदान परिसरात त्याची माहिती देणार्याला योग्य बक्षीस देण्याबाबतचे बॅनरही पोलिसांकडून लावण्यात आले होते.तर अधिकाऱ्यांवर श्वानाची भीतीअनेकदा अधिकारी घरी कारवाईसाठी जाताच तो त्यांच्यावर श्वान सोडत असल्याचेही समोर आले होते. तसेच, कारवाई दरम्यान खोटे आरोप करत अधिकाऱ्यांनाच अडकवीत असल्याचेही अनेकदा समोर आले. तसेच, पोलिसांच्या हाती लागताच आजारी पाडण्याचे कारण पुढे करत होता. त्याने संपूर्ण घरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे.

टॅग्स :पोलिसअटक