Join us

भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:38 PM

मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले.

मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढली असून, हा आकडा आता १४ वर गेला आहे. दरम्यान, या दुर्घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

होर्डिंग कंपनीचे मालक भावेश भिंडे यांचा आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन आमदार नितेश राणे यांनी आरोप केले आहेत. "काल वादळामुळे मुंबईत ठीक ठिकाणी दुर्घटना झाल्या. घाटकोपरमध्ये एक मोठी होर्डिंग पडली, यामुळे असंख्य मुंबईकरांना जीव गमवावा लागला. आता कालपासून एक माहिती समोर आली आहे की, होर्डिंग असणाऱ्या कंपनीला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली. यात तुमचा होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपला आहे, होर्डिंग काढून टाका असं सांगितलं होतं. पण तरीही त्या मालकाने ऐकलं नाही.  त्या मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो. हे भावेश भिंडे कोणाचे पार्टनर आहेत? संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी भिंडेंचे काय संबंध आहेत? , असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

" भावेश भिंडे यांना सुनिल राऊत यांनी सोबत घेऊन मातोश्रीवर फोटो काढला होता का? याचेही उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. संजय राऊत यांनी याबाबत एक पत्र पोलीस आयुक्त यांना लिहिले पाहिजे. या दुर्घटनेत जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. भावेश भिंडे यांचे जे जे पार्टनर आहेत त्या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी मी करतो, असंही नितेश राणे म्हणाले. 

 घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले

घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले असून या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढली असून, हा आकडा आता १४ वर गेला आहे. होर्डिंग अगदी तकलादू पद्धतीने लावले गेल्याचे स्पष्ट झाल्याने बेपर्वाईचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने  त्याखाली वाहने दाबली गेली. तर मुंबईत विविध ठिकाणी झाडे पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. रात्री नऊपर्यंत ७८ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना एवढी मोठी होती की, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. 

टॅग्स :नीतेश राणे भाजपाशिवसेनासंजय राऊतसुनील राऊतलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४