Join us  

पत्नी, नवजात बाळाला ‘दफन’ करायला निघालेला हृषभ कोण? मुंबई पोलिसांनी पिंजून काढली कब्रस्ताने

By गौरी टेंबकर | Published: June 29, 2023 12:41 PM

Mumbai: रुग्णालयात बाळंतपणात माझ्या पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांना कब्रस्तानात दफनविधीसाठी घेऊन आलो आहे; पण ते माझ्याकडे अधिक पैसे मागत आहेत, असा फोन करून पोलिसांना हैराण करणाऱ्या हृषभ हनीफ खान नामक व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

- गौरी टेंबकर-कलगुटकर  मुंबई : रुग्णालयात बाळंतपणात माझ्या पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांना कब्रस्तानात दफनविधीसाठी घेऊन आलो आहे; पण ते माझ्याकडे अधिक पैसे मागत आहेत, असा फोन करून पोलिसांना हैराण करणाऱ्या हृषभ हनीफ खान नामक व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. मदत मागणाऱ्या या व्यक्तीने पोलिसांना दोन दिवस वेगवेगळे लोकेशन सांगत हैराण करून सोडल्याचे अँटॉप हिल पोलिसांनी बुधवारी सांगितले.

परळच्या केईएम रुग्णालयात पत्नी आणि नवजाताचा मृत्यू झाला. दोघांनाही अँटॉप हिल परिसरातील कब्रस्तानात अंत्यविधीसाठी आणल्याचे हृषभने मंगळवारी पोलिसांना फोन करून सांगितले; मात्र तिथे दफनविधीसाठी आठ हजार रुपयांची अधिकची रक्कम मागितली जात आहे, असे सांगत तो रडू लागला. त्याची मदत करण्यासाठी थेट सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज हेगिष्टे यांना संबंधित व्यक्तीला सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून पोलिस हृषभचा ठावठिकाणा शोधत आहेत; मात्र हृषभ नक्की कोण, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसही या प्रकाराने चक्रावून गेले आहेत.

मनोज हेगिष्टे यांना हृषभने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फोन करत ‘आता सर्व विधी झाले आहेत. तुम्ही मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. मला तुम्ही आता डिस्टर्ब करू नका’, असे सांगितले. त्यावर हेगिष्टे यांनी त्याच्याकडे पत्नी व नवजाताला दफन केलेल्या कब्रस्तानची पावती मागितली; मात्र मी आता डिस्टर्ब आहे तुम्ही मला फोन करू नका असे हृषभ म्हणाला.

हा तर खोडसाळपणाआम्हाला संबंधित माहिती मिळाल्यापासून आम्ही कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. त्यामुळे खोडसाळपणे असा खोटा फोन कोणी केला असेल तर आम्ही त्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू.- सत्यनारायण चौधरी, सहपोलिस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था

सिमकार्ड मुंब्र्याचेआम्हाला वरिष्ठांचा फोन आल्यानंतर तातडीने आम्ही संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. तसेच तांत्रिक तपास करत त्याच्या ठावठिकाण्याचा मागोवा घेतला. त्यातून हृषभ सुरुवातीला मुंब्र्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मात्र दरवेळी तो अंधेरी, ओशिवरा, मालवणी अशी ठिकाणे सांगत आहे. त्यानुसार पथक पाठवत आम्ही आर्थिक मदत देत असल्याचेही त्याला सांगितले; मात्र त्याने त्याचा खरा ठावठिकाणा अद्याप सांगितलेला नाही. आमचा शोध सुरू आहे. - मनोज हेगिष्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अँटॉप हिल पोलिस ठाणे  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीस