Join us

पोराच्या आधार अपडेटची जबाबदारी कुणाची? सूचना देऊनही शाळांकडून टा‌ळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 1:10 PM

अजूनही राज्यातील १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नसल्याचे उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी सूचना देऊनही शाळांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. परिणामी, अजूनही राज्यातील १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नसल्याचे उघड झाले आहे.

आधारानुसारच शाळांची संचमान्यता

शिक्षण विभागाकडून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आधार प्रमाणित विद्यार्थी गृहीत धरले जाणार आहेत. त्याच माध्यमातून संचमान्यता केली जाणार आहे. मात्र, ज्या आधार कार्डमध्ये तफावती आढळल्या आहेत, त्यांची माहितीही या संचमान्यतेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

... तर वेतन थांबविणार

पटसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे रखडलेले समायोजन ३१ मेपूर्वी करण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी आदेश दिले आहेत. पण, अनेक शाळांमध्ये पदे रिक्त होऊनही तथा नवीन पद निर्माण होऊनही त्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाला कळविलेली नाही. त्यामुळे आता ज्या खासगी शाळा रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती देणार नाहीत, त्यांचे चालू महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्वरित शहानिशा करण्याच्या सूचना

आधारकार्ड संदर्भात काही तफावती आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहानिशा करून निर्णय घ्यावा.मात्र, त्यासाठीची सर्व प्रकरणे ही आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

१५ जूनपर्यंत मुदतवाढ

राज्यातील शाळांना आधारकार्ड पडताळणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही तब्बल १३ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जुळत नव्हते, तर तब्बल ३ लाख ९१ हजार विद्यार्थी आधारविना असल्याची माहिती समोर आली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंतच मुदत देण्यात आली असून त्यानंतर शाळांना कोणतीही संधी दिली जाणार नाही.

 

टॅग्स :आधार कार्डमुंबई