Join us

कचऱ्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या बैठकीत घमासान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 5:57 AM

मुंबईसह एमएमआर विभागामधील कचऱ्याचा प्रश्न हा केवळ कचऱ्याच्या ढिगा पुरता मर्यादित राहिलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबईसह एमएमआर विभागामधील कचऱ्याचा प्रश्न हा केवळ कचऱ्याच्या ढिगा पुरता मर्यादित राहिलेला नाही. यामध्ये होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल हा या सगळ्या विषयातील कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या कचऱ्याची जबाबदारी घ्यायची तरी नेमकी कोणी..? यावर ‘लोकमत’ने ‘यंदा कर्तव्य आहे’ मोहिमेसाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत घमासान चर्चा झाली. काहींच्या मते ही जबाबदारी महापालिकेची होती... तर काहींनी जनतेची काहीच जबाबदारी नाही का असा प्रश्न उपस्थित केला.

कचरामुक्ती, रस्ते सुरक्षा, शिक्षण आणि महिला सुरक्षा या चार महत्त्वाच्या विषयांबद्दल सर्वसामान्य वाचकांची कर्तव्यबुद्धी सर्तक रहावी, यासाठी ‘लोकमत’ने १ मार्चपासून ‘यंदा कर्तव्य आहे’ ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. या विषयांचे विविध पैलू मांडून जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत मार्गदर्शन करण्यासाठी त्या- त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवरांची मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई अशा तीन स्थानिक समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समित्यांची पहिली बैठक मंगळवारी झाली. पहिल्याच बैठकीत मान्यवरांनी मोहिमेची रूपरेषा निश्चित केली आणि त्यानुसार बातम्यांचे विषय, त्याची मांडणी, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे आदी गोष्टींचा सातत्याने आढावा घेण्याचे ठरवले आहे.

नवी मुंबईतील तज्ज्ञांनी मांडले वेगळेच मुद्दे

- नवी मुंबईत झालेल्या बैठकीत, ‘लोकमत’ने कचरा समस्येविषयी अभियान सुरू करून पहिल्याच दिवशी कामगारांच्या कष्टाला सलाम केला, ही अत्यंत सकारात्मक व आनंददायी गोष्टी आहे. या उपक्रमामुळे कामगारांचेही प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी मांडले.

- नदी, नाले, होल्डिंग पाँडमध्ये कचरा टाकला जातो. त्यामुळे होल्डिंग पाँड भरले जाऊन शहरात पाणी शिरत आहे. नदी प्रदूषित होत आहे. या समस्यांना या मोहिमेमुळे आवाज मिळेल, अशी भूमिका कासाडी नदी बचाव समितीचे मुख्य समन्वयक योगेश पगडे यांनी मांडली.  कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली तरच ते शक्य होईल. त्यासाठी कचरा वर्गीकरणाची सवय लागली पाहिजे, अशी अपेक्षा  परिसर सखी विकास संस्थेच्या अध्यक्ष रुक्मिणी पॉल यांनी व्यक्त केली.

- तसेच कचरा ही समस्या नसून तो योग्य पद्धतीने हाताळला जात नाही, ही खरी समस्या आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागृती होईलच, शिवाय प्रशासकीय स्तरावरही या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे श्रुतिका फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रकाश कारणे यांनी स्पष्ट केले. तर घनकचरा हा सर्व महानगरांना भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे. शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून डम्पिंग ग्राउंड व कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याला या उपक्रमामुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा नाटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या बैठकीत अशी झाली चर्चा...

-  मुंबईत झालेल्या बैठकीत, कोरोनासारख्या आजाराने थैमान घातलेले असताना ही मोहीम सुरू झाली आहे. रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी ही मोहीम चांगले काम करणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण ही मोहीम करणार आहे. कचऱ्याचे नियोजन झाले तर आरोग्याचे रक्षण होते, असे मत नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी मांडले. तळागाळात काम करणाऱ्या कचरावेचकांकडे, त्यांच्या आरोग्याकडे कोणाचेच लक्ष नसते. ही मोहीम त्यांच्या आरोग्याला बळकटी देईल. शिवाय महापालिकांना याद्वारे नवीन दृष्टिकोन मिळेल.

- प्रत्येक नागरिकाला आपली कचऱ्याविषयीची जबाबदारीची जाणीव याद्वारे होईल, असा विश्वास स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी व्यक्त केला. मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी यंदा कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. घराघरात ही मोहीम कचऱ्याविषयी जनजागृती करेल आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावेल, असा आशावाद मांडला, तर कचरा नियोजनासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. 

- या मोहिमेद्वारे प्रशिक्षण मिळण्यास नक्कीच मदत होईल. कचरा म्हटले की प्रदूषण आले. त्यामुळे कचरा नियोजनाचे धडे देताना ही मोहीम पर्यावरण संवर्धनास हातभार लावेल, असे मत वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले.

ठाणेकरांचे मुद्देच भारी

- ठाण्यात झालेल्या बैठकीत, घनकचऱ्याची विल्हेवाट ही अत्यंत ज्वलंत समस्या आहे. त्याच्याबाबतीत जनजागृती करण्याचा हा उपक्रम चांगला आहे, अशी भावना कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी मांडली. तर यंदा कर्तव्य आहे, या मोहिमेतून कचरा वर्गीकरणासाठी लोकांची मानसिकता तयार व्हावी, अशी अपेक्षा ठाणे महापालिकेतील प्रभारी आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर यांनी व्यक्त केली. पर्यावरण दक्षता मंडळाचे संचालक विद्याधर वालावलकर यांनी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना आपल्या परीने जनजागृतीसाठी काम करीत असतात.

- मात्र, वाचकांचा उदंड प्रतिसाद असलेल्या ‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्राने पर्यावरण रक्षणाची हाती घेतलेली मोहीम व्यापक परिणाम करणारी ठरेल, असे स्पष्ट केले. तसेच घनकचऱ्यासारख्या लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला स्थान एवढे महत्त्वाचे स्थान मिळणे हेच या समस्येची तीव्रता दाखवते, असे मत लेखक आणि दिग्दर्शक विजू माने यांनी मांडले. त्याचबरोबर, सफाई कामगार हा या विषयातील सर्वांत उपेक्षित घटक असून त्याच्यावरील अन्यायाला या मोहिमेत वाचा फुटावी, अशी अपेक्षा सफाई कामगारांचे नेते जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केली.

टॅग्स :लोकमतमुंबईठाणेनवी मुंबईकचरा प्रश्न