"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:31 AM2023-05-25T09:31:41+5:302023-05-25T09:41:31+5:30

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत

"Who is taking them away?", Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray, laughs at CM Shinde | "त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

googlenewsNext

नवीन संसद भवनाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. परंतु राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला न बोलावता पंतप्रधानच नूतन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. 

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. मात्र, अशी माहिती समोर येत आहे की, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू, असे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सुनावले. लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे हे अत्यंत अयोग्य आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणे सांगत आहेत ती हास्यास्पद आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध केला असून आपण सहभागी होणार नसल्याचे म्हटले, त्यावर फडणवीसांनी खोचक टोला लगावला. 

उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, अशा शब्दात फडणवीसांनी बोचरी टीका केली. यावेळी, एकनाथ शिंदे यांनी मान हलवत बरं म्हणून फडणवीसांच्या उत्तराला हसत-हसत दाद दिली. तसेच, उद्धव ठाकरेंना जी जागा दिली होती, तिथे ते जात नाहीत. विधानपरिषदेचे सदस्य आहेत, २ तास जाऊन तिथे बसत नाहीत. मग, त्यांना कोण लोकसभेत बोलावणार आहे, कोण पार्लमेंट हाऊसमध्ये बोलावणार आहे?, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची एकप्रकारे खिल्ली उडवली. तसेच नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झाले आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झाले आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही

वर्षानुवर्षे नवीन संसद भवन निर्माणाची चर्चा व्हायची. ते कुणी बनवू शकले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवले त्यामुळे कुठेतरी पोटात दुखत आहे आणि तेच दिसते आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसते आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Web Title: "Who is taking them away?", Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray, laughs at CM Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.