Join us

Shivsena: ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 9:08 PM

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंबद्दल अद्यापही टिका केली नाही.

मुंबई - काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने राज्यात फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना मुलाखत देताना बंडाची ठिणगी पेटण्यापासून ते गुवाहाटी, गोवा आणि गव्हर्मेंट असा प्रवास दिलखुलासपणे उलघडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांना बंडखोरी का केली आणि निधीमध्ये कशाप्रकारे दुजाभाव केला जायचा, याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी, मातोश्रीवर होत असलेल्या दुर्लक्षपणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या चांडाळ चौकडीबद्दलचा राग जाहीर करत, त्यांची नावेही घेतली.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंबद्दल अद्यापही टिका केली नाही. मात्र, उद्धव ठाकरेंसोबतच्या शिवसेना नेत्यांच्या त्रासाला आपण कंटाळल्याचे त्यांनी जाहीर केले. अनेकांनी संजय राऊतांवर थेट प्रहार केला. तर, काहींनी इतरही नेत्यांबद्दलची नाराजी व्यक्त केली. सांगोल्याचे नेते आणि गुवाहाटी मिशनमधील प्रसिद्ध आमदार शहाजी बापू पाटील यांनी तर थेट चांडाळ चौकडींची नावेच सांगून टाकली. विशेष म्हणजे त्यांनी 5 नावे जाहीर केली. त्यात, पावचे नाव हे अरविंद सावंत यांचे घेतले.

ती चौकडी कोण असा प्रश्न विचारला असता, पहिलं नाव संजय राऊत यांचं घेतलं. त्यानंतर, सुभाष देसाई, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर आणि अरविंद सावंत अशी 5 नावे त्यांनी घेतली. ही पाच मंडळी त्यांच्याच कोंडाळ्यात उद्धव ठाकरेंना घेऊन यायची आणि त्यांच्याच कोंडाळ्यात गाडीत घेऊन जायची. म्हणजे आम्ही बाजूला, पण कोण आलाय... शहाजी आलाय... ये काय तुझं काम आहे, सांगोल्यात काय म्हणतोय... असं विचारायला हवं, असे म्हणत आपली कैफितय माध्यमांसमोर मांडली. 

एकनाथ शिंदेच माझे नेते

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे. राग शून्य आणि सगळ्यांना शांततेनं समजावून सांगणारं नेतृत्त्व. एकनाथ शिंदे हे खरोखर क्षमता असलेलं नेतृत्व आहेत, अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच, उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्याजवळील चौकडीबद्दल त्यांनी राग व्यक्त केला. 

'50 आमदारांना ते आवडलं नाही'

एका वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजी बाजू पाटील म्हणाले की, 'आमचे हे बंड काल-परवा ठरलेले नाही. याची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच झाली. मविका सरकार कुणालाच आवडले नव्हते. पण आम्ही सांगणार कोणाला, आमचे आमदार म्हणून शपथविधी झाले, नंतर घराकडे गेलो. नंतर अचानक फोन आला आणि मुंबईला बोलावलं. तिथे या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये फिरवलं. उद्धव ठाकरे रात्री यायचे, काही मिनीटे बोलायचे आणि निघून जायचे. आम्हाला तेव्हा काहीच कळतं नव्हतं की, नेमकं चाललंय काय. ज्यांच्या विरोधात आपण लढलो, तिच माणसं सत्तेत सोबत असणार. आता काम कसे होणार, याचाच विचार मनात यायचा.' 

संजय शिरसाट यांनीही साधला निशाणा

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावलं, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी पक्षनेतृत्त्वार आणि त्यांच्याजवळील काही लोकांचा चांडाळ चौकटी म्हणत चांगलाच समाचार घेतला. तर, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसं, असा सवालही संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत असताना उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर आहे सगळं, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेआमदारसंजय राऊत