मुंबई : आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत होत आली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे दोन वेळा निवडून आले आहेत. आता मात्र गणिते बदलली आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यावर खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले आहेत, तर ठाकरे गटाने मुंबईतील एक जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडीकडून शेवाळे यांच्याविरोधात दंड थोपटण्यात आले असले तरी मविआचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता मतदारांना आहे.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
अणुशक्तीनगर, चेंबूर आणि दादर, माहीममध्ये शिवसेनेचा दबदबा आहे, सायन कोळीवाड्यात भाजप, तर धारावी आणि वडाळ्यात काँग्रेसचे प्राबल्य आहे. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे या मतदारसंघातून २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचा दीड लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे शिंदे गटात गेले. मुंबईतील बोटावर मोजण्याइतके नगरसेवक वगळता शिंदे गटात अजून म्हणावे तसे इनकमिंग झालेले नाही. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत पाहायला मिळणार आहे.
दक्षिण मध्य मुंबईत मराठीसोबतच दाक्षिणात्य व इतर बहुभाषक मतदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड हे येथून मोठ्या मताधिक्याने २००४ मध्ये निवडून आले होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या २००४ पासून आमदार म्हणून चार वेळा धारावीतून निवडून आल्या आहेत. खासदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आल्याने शेवाळे यांच्याविरोधात खासदारकीसाठी त्या उभ्या राहतील, याची शक्यता नगण्यच असल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात.
आगामी लोकसभा निवडणूक पाहता उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असून, लोकसभेची एक जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर उभे राहणार का, याबाबत मतदारसंघात चर्चा आहे. मात्र, अकोला मतदारसंघ सोडून दक्षिण मध्य मुंबईत आंबेडकर निवडणूक लढवतील याची शक्यता धूसरच आहे. मविआला भक्कम उमेदवार शोधावा लागणार असून, हा उमेदवार काँग्रेस की शिवसेना (ठाकरे गट) यापैकी कोणत्या पक्षाचा असेल, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे राहुल शेवाळे यांचे पारडे जड असले तरी विकासकामे पाहता जनता त्यांच्या कामावर खुश नाही.
हॅट्ट्रिक होणार का?शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी २०१४ साली काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत ३ लाख ८० हजार ७४७ मते मिळवली होती, तर २०१९ साली काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा त्यांनी पुन्हा पराभव केला होता. आता तिसऱ्यांदा निवडून येत शेवाळे हॅट्ट्रिक करतील का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपची भूमिका काय?पालघरच्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात तब्बल ९ मिनिटे संवादच झाला नाही, तसेच शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही वारंवार खटके उडत आहेत. त्यामुळे येत्या काळात हा वाद विकोपाला गेला, तर भाजप या मतदारसंघावर दावा करू शकते.
ग्राउंड लेव्हलला ठाकरे गट स्ट्राँगया मतदारसंघातील विभागवार बलाबल पाहता शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या याठिकाणी जास्त आहे. मानखुर्द, दादर, वडाळा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या तुलनेत शिवसेनेच्या ठाकरे गटातील नगरसेवकांचाच दबदबा जास्त आहे. तळागाळात ठाकरे गट बळकट असल्याने त्याचा फटका शेवाळे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...अशी आहे विधानसभा
दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा आणि माहीम, असे सहा विधानसभा मतदारसंघ असून, अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादीचे नवाब मलिक, चेंबूर येथून शिवसेना (ठाकरे गट) प्रकाश फातर्फेकर, धारावी येथून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडा येथून भाजपचे कॅप्टन आर. तमील सेल्वन, वडाळा येथून भाजपचे कालिदास कोळंबकर आणि माहीम येथून शिवसेना (शिंदे गट) सदानंद सरवणकर हे निवडून आले आहेत.