मुंबई : जुन्या काँग्रेसजनांचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या हाती आहे. खासदार पूनम महाजन यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत हा मतदारसंघ मिळवला. मात्र मतदारांचा नाराजीचा सूर वरिष्ठांपर्यंत गेल्याने पक्षांतर्गत तसेच विरोधकांच्या टीकेच्या त्या धनी झाल्याने भाजप उत्तर मध्य मुंबईसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.
केंद्र व राज्यात सत्ता असूनही २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य येथे घटले होते. त्यामुळे नवीन तरुण उमेदवार देण्यासाठी भाजपची शोधाशोध सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचीही येथे चर्चा आहे. यापूर्वी भाजपकडून दोनदा या मतदारसंघाचे सर्वेक्षण झाले आहे. त्यात महाजन यांच्या कामासंदर्भात मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याने वरिष्ठांना सूचनाही करण्यात आल्या होत्या. सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांतील भाजपची ताकद कमकुवत झाल्याची चर्चा आहे.
बाबा सिद्धीकी यांच्यासाठी आग्रह -
१) काँग्रेसमध्ये सुद्धा हवा तसा चेहरा स्थानिक नेतृत्वात नाही. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा सिद्धीकी यांच्यासाठी आग्रही आहे; मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणाचे नाव निश्चित होते, यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
२) उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पूर्वीसारखी ताकद महाजन यांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.
३) राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या कुर्ला परिसरातील मुस्लीम मतदार निर्णायक आहेत. भाजपने मलिक यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने त्यांची मदत मिळणे शक्य नाही.