Join us

इंडिया आघाडीकडून PM पदाचा चेहरा कोण?; शरद पवारांनी सांगितला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 5:36 PM

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी विकासकामांच्या माध्यमातून मिरवत आहेत. तर, विरोधकही एकजुटीची मोट बांधताना दिसत आहेत. सध्या, विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये १४ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर होत्या. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी बैठकीत ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात असल्याचे वृत्त होते. मात्र, स्वत: नितीशकुमार यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर, त्यांनी लालू प्रसाद यादव यांचं नाव त्यांनी संयोजक पदासाठी सूचवलं. बैठकीनंतर शरद पवारांनी बैठकीतील चर्चेसंदर्भात माध्यमांना माहिती दिली. जागावाटपावर लवकरात लवकर निर्णय होईल, त्यावर बैठकीत चर्चा झाल्याचं पवार म्हणाले. 

''काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, लवकरात लवकर जागावाटप अंतिम करण्यावर चर्चा झाली. तसेच, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे या आघाडीचं प्रमुखपद देण्यात येणार आहे. यावर, सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं. त्यानुसार, आम्ही पुढील योजना आखत आहोत. या बैठकीत आघाडीचं संयोजकपद नितीशकुमार यांनी घ्यावं, असं सर्वांनीच सूचवलं होतं. मात्र, सध्याचे जे प्रभारी आहेत, त्यांनीच हे पद पुढे सांभाळावे, असं मत नितीशकुमार यांनी मांडल्याचं'' शरद पवारांनी सांगितला. यावेळी, शरद पवारांना इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ही पवारांनी स्पष्टणे उत्तर दिलं. 

निवडणुकांच्या निकालात आम्हाला बहुमत मिळाल्यास आम्ही देशाला चांगला पर्याय देऊ शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे, सध्यातरी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा कोणीही चेहरा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

प.बंगालमधील जागांवरुन एकमत नाही

काँग्रेस नेते सिताराम येचुरी, सोनिया गांधींसह इतर ब्लॉकच्या नेत्यांनी नितीशकुमार यांचे नाव संयोजकपदासाठी समोर आणले होते. या बैठकीला जदयुकडून स्वत: नितीशकुमार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष ललनसिंह व संजय झा सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी, या बैठकीत बोलताना, जागावाटप हा सर्वात कठीण काम असल्याचे म्हटले. तसेच, काही बड्या पक्षाच्या प्रमुखांनी बैठकीत उपस्थिती न दर्शवल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.  

टॅग्स :शरद पवारनितीश कुमारपंतप्रधानइंडिया आघाडी