मुंबई - महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि,31 जानेवारीच्या आदेशानुसार आरे येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांची बदली दि,31 रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी ( अंमलबजावणी ) या पदावर करण्यात आली आहे. शासनाचे उपसचिव संतोष गावडे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने सदर बदलीचे आदेश काढले होते. त्यातच पशु, दुग्धव्यवसाय खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची दि,१८ जून रोजी बदली झाली असून त्यांनी आपला पदभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवला आहे.
५ महिने झाले तरी आरेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. मुख्य अधिकारी यांच्याकडे आरेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते ५ महिन्यातून फक्त ३ वेळेला ऑफिसला आले आहेत. आरेवासीय त्यांना भेटण्यासाठी दिवसभर वाट पाहून तात्काळत बसतात. त्यामुळे आरेवासीयांना वाली कोण? आरेवासीयांनी समस्या मांडायच्या तरी कोणाकडे असा सवाल सुनील कुमरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
एक ना अनेक समस्याचे माहेर घर बनलेल्या आरे ऑफिसला पूर्ण वेळ कार्यकारी अधिकारी मिळावा ही आरेच्या जनतेची हाक आहे .याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि लवकर आरेत कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी कुमरे यांनी केली.
काय आहेत आरेवासीयांच्या समस्या -आरे मधील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा,आरे युनिट क्रमांक 16 मधील आरे हॉस्पिटल ठेकेदाराला न देता आपला दवाखाना म्हणून घोषित करा, आरे मधील नागरिकांना लाईट मीटर व घर दुरुस्तीला परवानगी द्या,आरेतील पडायला आलेली सरकारी निवासस्थाने व शौचालये तात्काळ दुरुस्त करा,आरेतील सर्व धार्मिक स्थळांना लाईट मीटर व दुरुस्तीसाठी परवानगी द्या या विविध मागण्या आहेत.परवानगी मागितली तर आता परवानगी बंद झाली म्हणून उत्तर मिळते. आरेत रोज अनेक ठिकाणी राजरोस कचरा टाकला जातो .त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे.