मुंबई - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापन केल्यानंतर गावखेड्यातून लोकं जोडली गेली. पाहाता, पाहात हा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यामुळेच, राज्याच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेतही शिवसेनेचे आमदार-खासदार पोहोचले. बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात आता माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असे म्हणत शिवसैनिकांना भावनिक आवाहनही केले. कारण, अगोदरच राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे नावाने नवा पक्ष स्थापन केला होता. तर, आता शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीमुळे शिवसेना नेतृत्त्वार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली. तर, विचारांचे वारसदार हेच खरे वारसदार असल्याचं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला देण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा निर्णय घेतल्याने सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर आणि बाळासाहेबांचे राजकीय वारसदार म्हणून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र, या लढाईत शिवसेना खासदार संजय राऊत पक्षाची भूमिका माध्यमांत आणि इतरही ठिकाणी परखडपणे मांडतात.
संजय राऊत हे खरी शिवसेना ही आमचीच असल्याचं ठणकावून सांगतात. तर, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असल्याचंही सांगतात. दरम्यान, एका वृत्तवाहिनीवर संजय राऊत यांना दोन स्क्रीनवर २ फोटो दाखवण्यात आले होते. त्यामध्ये, एक फोटो एकनाथ शिंदे तर दुसरा राज ठाकरे यांचा होता. या दोन्हींपैकी बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, दोघेही नाही, जे बाळासाहेबांना सोडून गेले ते त्यांचे वारसदार होऊच शकत नाहीत, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. तसेच, या दोघांपैकी चांगला नेता कोणता? असे विचारले असता, दोघांमध्येही नेतृत्त्वगुण नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे राजकीय गुण असल्याचं मनसैनिक म्हणतात, तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत, त्यामुळे तेच राजकीय वारसदार असल्याचं शिंदे गटाचे शिवसैनिक सांगतात.