अध्यक्ष कोण? प्रशांत की प्रसाद?, १६ मे रोजी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची होणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 12:36 PM2023-05-07T12:36:01+5:302023-05-07T12:36:59+5:30
मागच्या महिन्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने बाजी मारली.
मुंबई : मागच्या महिन्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने बाजी मारली. त्यामुळे नाट्यपरिषदेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, प्रशांत की प्रसाद? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. १६ मे रोजी होणाऱ्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीत यावरून पडदा उठणार आहे.
१६ एप्रिलला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर महिन्याभराने म्हणजेच १६ मे रोजी कार्यकारी समितीची निवडणूक होणार आहे. नाट्य परिषदेच्या संकुलात म्हणजे माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाच्या आवारात सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यकारी समितीची निवडणूक प्रकिया पार पडणार आहे. यात नियामक मंडळावर निवडून आलेले ६० सभासद आपल्यातूनच १९ उमेदवारांची कार्यकारिणीवर निवड करतील. अध्यक्ष, कार्यवाह, उपाध्यक्ष, सहकार्यवाह, कोषाध्यक्ष आणि सभासदांची निवड केली जाईल. निवडणुकीची रणधुमाळी वाजण्यापूर्वीपासूनच अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. दोघेही निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या चर्चेला उधाण आले, पण दोन्ही उमेदवारांनी संयम राखत कार्यकारी समितीच्या निवडणुकीत जो कौल मिळेल तो मान्य असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकारिणी समितीची निवडणूकही अतिशय शांततेत पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरलेले प्रसाद आणि प्रशांत कशाप्रकारे आपापले कॅनव्हासिंग करतात, त्यावर अवलंबून आहे.
२०१८ च्या निवडणुकीत आपलं पॅनेलचे १६ पैकी ११ उमेदवार निवडून आले होते, तर विरोधकांचे पाच होते. यावेळी त्यांचे १० आणि आमचे चार आले. आता १६ ऐवजी १४ जागा झाल्या आहेत. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात जे काम केले असून, यापुढेही करत राहू. निवडणुकीला उभ्या राहिलेल्यांना शुभेच्छा. - प्रसाद कांबळी, निर्माते.
रंगकर्मी नाटक समूहावर विश्वास दाखवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिल्याबद्दल सर्व रंगकर्मींचे आभार. कार्यकारी समितीच्या निवडणुकीबाबत इतक्यात फार काही बोलता येणार नाही, पण काम करायची संधी मिळाली तरी मोठ्या कॅनव्हासवर उत्तम काम करता येईल. विजयी झाल्याने उत्साह आहे.
- प्रशांत दामले, अभिनेते, निर्माते.
उमेदवारांनी अर्ज भरून मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याकडे जमा केले आहेत. याबाबत दळवी म्हणाले की, १९ जागांसाठी जवळपास ३० जणांनी अर्ज भरले आहेत. ४ मे रोजी ही नामांकन भरण्याची अखेरची तारीख होती. नामांकन अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. वैध असलेल्यांपैकीही काही जण १० मेपर्यंत माघार घेऊ शकतात.