Join us  

कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 1:34 PM

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही काही महत्वाच्या जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई/सांगली - शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या स्टाईलने शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका करतात. तर, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपासोबत गेलेल्या अजित पवार गटावरही ते बोचऱ्या शब्दाता निशाणा साधताना पाहायला मिळतात. यापूर्वीही राऊत यांनी अजित पवारांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. तर, कोण संजय राऊत?, असे म्हणत अजित पवारांनीही त्यांना महत्व देत नसल्याचं दाखवून दिलं. मात्र, आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी अजित पवारांची खिल्ली उडवली. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन सध्या महायुती व महाविकास आघाडीत वाटाघाटी सूरू आहेत. त्यावरुन, राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही काही महत्वाच्या जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच, नाशिक, ठाणे, सातारा, माढा या जागांवरील उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. तर, सांगलीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून सांगलीची जागा आमची हक्काची असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंदर्भात काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम पायाला भिंगरी लावून वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. मात्र, शिवसेना चंद्रहार पाटील यांच्या नावावर ठाम असल्याचे दिसून येते. त्यातच, संजय राऊत निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सांगली व कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी सांगलीतील जागेबाबत माहिती दिली. 

सांगलीतील जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू असल्यावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, ''जागावाटपावरुन मतभेद हे युती आणि आघाडीमध्ये होतच असतात. मिंधे गट, भाजप आणि कोण ते घड्याळ वाले... अजित पवारांचा गट त्यांच्यात कुठे अजून अंतिम झालंय. एखाद दुसऱ्या जागेवर पेच पडतोच'', असे म्हणत अजित पवारांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न खासदार राऊत यांच्याकडून झाला. तसेच, लवकरच सांगलीतील जागेचा तिढा संपुष्टात येईल, असेही त्यांनी म्हटले.  

आमच्याकडून सांगली आणि भिवंडीत पेच आहे. भिवंडीत राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय, तर सांगलीत शिवसेनेचा, पण एकमेकांशी चर्चा करुन हा उमेदवार दिला आहे. स्थानिक घटकांना वाटतं की भिवंडीत काँग्रेसने लढावे, मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. शिवसेनेचे म्हणतात आपली जागा आपण लढलं पाहिजे, राष्ट्रवीदीचे म्हणतात आपली जागा आपण लढावं. वरिष्ठांचं काम त्यांची समजूत काढणे आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचार करणे आहे. हे सांगली-भिवंडीत होईल", असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

विश्वजीत कदमांशी फोनवरुन चर्चा

संजय राऊत सांगली दौऱ्यावर असताना विश्वजीत कदम यांच्याशी त्यांनी फोनवर चर्चा केली. सांगली जिल्ह्यात आमचे परंपरागत मतदार असल्याने ही जागा आम्ही सोडू शकत नसल्याची भूमिका कदम यांनी मांडली आहे. मात्र संजय राऊत यांच्याकडून या भूमिकेला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. तसंच तुटेपर्यंत ताणू नये, अशी काँग्रेस नेत्यांची आणि आमचीही भूमिका असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :संजय राऊतअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससांगली