"मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवतंय ?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:56 AM2018-06-27T07:56:26+5:302018-06-27T07:56:41+5:30

राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांना पुणे पोलिसांनी अटक केली याची कानोकान खबर राज्याच्या पोलीस महासंचालकांना तर नव्हतीच, पण गृहखाते सांभाळणा-या मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या प्रकरणात अंधारात ठेवले गेले.

"Who is keeping the Chief Minister in the dark and keeping the home's house?" | "मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवतंय ?"

"मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवतंय ?"

Next

मुंबई- राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांना पुणे पोलिसांनी अटक केली याची कानोकान खबर राज्याच्या पोलीस महासंचालकांना तर नव्हतीच, पण गृहखाते सांभाळणा-या मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या प्रकरणात अंधारात ठेवले गेले. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर कारवाई झाली व ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याच्या बातम्या आता प्रसिद्ध झाल्या आहेत ही चिंतेची बाब आहे.

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवीत आहे, हा पहिला प्रश्न व मुख्यमंत्र्यांविरोधात कारस्थाने कोण रचित आहे, हा दुसरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांस खतम करू, अशा धमकीचे एक (निनावी) पत्र अलीकडेच मिळाले. तेव्हापासून राज्याची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भोवती ‘कडक’ आणि अभेद्य असे सुरक्षाकवच आहे व पोलीस चोख बंदोबस्त करीत आहेत, पण गृहखातेच पोखरले गेले आहे व मुख्यमंत्र्यांचे दुश्मन त्यात घुसले आहेत ही बातमी झोप उडवणारी आहे. 

मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर कारवाई झाली व ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याच्या बातम्या आता प्रसिद्ध झाल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसे व्हायचे! गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर दानवे, शेलार, खडसे, गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा. मुख्यमंत्री, काळजी घ्या!

काय म्हटलं सामना अग्रलेखात ?
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटकेने  राज्याच्या गृहखात्याच्या चिंध्या बाहेर आल्या आहेत. डी. एस. के. यांना बँकेने कर्ज दिले. त्या कर्जाचा विनियोग योग्यप्रकारे झाला नाही. गुंतवणूकदारांची फसवणूक झाली त्याबद्दल डी. एस. के. व त्यांच्या गोतावळ्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र ‘डी. एस. के.’ना कर्ज दिल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक झाली व त्या अटकेचे पडसाद सध्या उमटत आहेत. मराठे यांची अटक म्हणजे झोपलेल्या, सुस्तावलेल्या गृहखात्याचे वाभाडे आहेत. गृहखात्यात दहशतवादी घुसले आहेत की नक्षलवादी याचा शोध आता घ्यावा लागेल. कारण गृहखात्यात मुख्यमंत्र्यांचे ‘वैरी’ घुसले असतील तर हा धोका फक्त मुख्यमंत्र्यांनाच नसून संपूर्ण राज्याला आहे. हिंदुस्थानी लष्करातही पूर्वी ‘सी. आय. ए.’, ‘केजीबी’ व आता आय. एस. आय.चे हस्तक बेमालूमपणे घुसलेच होते. चीनचे हस्तकही कालपर्यंत अशी घुसखोरी करीत होते. सरकारातील गुप्त माहिती व अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती ‘विकली’ जाते हे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दुश्मनांनी गृहखात्यावर ताबा मिळवून काही कारवाया केल्या असतील तर तो प्रकार धक्कादायक आहे. राजकारण हा आता बुद्धिबळाचा खेळ राहिलेला नाही. फसवाफसवी, खुनाखुनी आणि विश्वासघात म्हणजे सध्याचे राजकारण. नैतिकता व साधनशुचितेच्या गप्पा मारणारेच हे साम, दाम, दंड, भेदाचे प्रयोग राजकारणात करू लागले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची आम्हाला चिंता वाटत आहे व बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मराठे यांना अटक करताना जो ‘दंड-भेद’ वापर झाला त्यामुळे या चिंतेत भर पडली आहे. ‘दंड-भेदा’च्या नीतीने अनेक राज्ये लयास गेली व अनेक बडे नेते बोलता बोलता अस्तंगत झाले. स्वतःचेच लोक जेव्हा गुप्त कारवायांत रस घेऊन असे ‘दंड-भेद’ करू लागतात तेव्हा राज्य प्रमुखाचे काही खरे राहत नाही हे समजून घेतले पाहिजे.
बँक ऑफ महाराष्ट्र प्रकरणात मुख्यमंत्र्यांची ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’ हे सिद्ध झाले आहे. ‘२६/११’च्या हल्ल्याच्या वेळी ‘कसाब’ घुसला तेव्हा गृहखात्याचे धिंडवडे निघाले. आता ‘मराठे’ अटक प्रकरणात गृहखात्याचे पुन्हा तसेच धिंडवडे निघत आहेत. आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या आसपास अलीकडे संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत आहेत. दोन-चार खून करून सुटलेले काही लोक भाजपच्या अंतर्गत गोटात घुसले असून त्यांचा वावर मुख्यमंत्र्यांच्या आसपास दिसतो.  त्यामुळेच भीमा-कोरेगाव प्रकरणाने महाराष्ट्र पेटला. याच विरोधी गटाने राज्यातील अबलांवर बलात्कार व खून करायला लावले. या विरोधकांनी लातुरात परवा कोचिंग क्लास मालकाचा खून करायला लावला. नक्षलवाद्यांपेक्षा हे भयंकर असून गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर दानवे, शेलार, खडसे, गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा. मुख्यमंत्री, काळजी घ्या!

Web Title: "Who is keeping the Chief Minister in the dark and keeping the home's house?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.