- नितीन जगतापमुंबई : मुंबईमध्ये कोरोना निर्बंधांच्या काळात रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली होती, कमी वर्दळ असल्याने अनेक वाहनचालक वाहने सुसाट चालवत आहेत. त्यामुळे वेगाची मर्यादा पाळते कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहन अपघातात अनेकांचा बळी जात आहे. त्यामध्ये भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असले तरीही वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही.
दरवर्षी मुंबईत सरासरी ८ हजार अपघात हे अधिक वेगाने गाडी चालवल्याने होतात. त्यामानाने स्पीड गन कॅमेरा ही प्रणाली मुंबईत कमी प्रमाणात आहे, असे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सांगतात. परंतु, स्पीड गन ही प्रणाली लावल्यापासून मुंबईत अधिक वेगाने वाहन चालवून झालेले अपघात कमी प्रमाणात होत आहेत, असेदेखील सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञान प्रणालीच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावला आहे. या प्रणालीअगोदर सुसाट गाड्यांमुळे अनेक अपघात शहरात झाले, ते चित्र कमी झाल्याचे सध्या दिसत आहे.
वेगाने वाहन चालविण्यात तरुण मुलांचे प्रमाण अधिक आहे, त्यांचे हे नियम उल्लंघन करणे धोकादायक आहे. वाहनाची वेग मर्यादा ओलांडल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियम पाळावेत.- वरिष्ठ अधिकारी, वाहतूक विभाग
अशी होते कारवाई
पूर्वी द्रुतगती मार्गावर ताशी वेगमर्यादा ६० असावी, असा नियम आहे. परंतु, बहुसंख्य वाहने ८० ते १०० किलोमीटरच्या वेगाने धावत आहेत. जे. जे. उड्डाणपुलावर वेग मर्यादा ४० अशी आखून दिली आहे. मात्र, काही गाड्या ७० ते ८०च्या वेगाने चालायच्या. त्यामुळे अनेक अपघात घडत होते मात्र आता स्पीड गन प्रणालीमुळे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता महामार्गावर काही प्रमाणात स्पीड गन बसविण्यात आल्या आहेत. त्यानुसार वेग मर्यादा तोडणाऱ्यांवर कारवाई होते.
काय आहे वेगमर्यादा नियम व किती दंड
देशभरात रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असताना, याविषयीचा कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या प्रश्नाची अत्यंत गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने मोटार वाहने कायदा, १९८८मध्ये सुधारणा करून मोटार वाहने (दुरुस्ती) कायदा, २०१९ हा १ सप्टेंबरपासून लागू केला. त्यानुसार अधिक वेगाने गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाते.
स्पीडगनची मर्यादा
शहरात काही रस्त्यांची एकूणच लांबी पाहता स्पीड गन कुचकामी ठरत असल्याचेही चित्र आहे. जे. जे.सारखा उड्डाणपूल मार्ग आहे, त्यावर केवळ दोन स्पीड गन बसविण्यात आल्या आहेत. हा मार्ग अडीच किलोमीटरचा आहे. याठिकाणी स्पीड गन आहे त्याठिकाणी वाहक गाडीचा वेग कमी करतात व ज्याठिकाणी नाही तेथून गाड्या अधिक वेगाने आणत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे स्पीड गन कुठे तरी कमी पडत असल्याचे चित्र दिसते.