लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण गंभीर आहे. पूनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून, ती राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा पूनावाला यांनी करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, पूनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून लवकरात लवकर भारतात येऊन लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे आणि भारताची लसीची गरज भागवावी. गरज पडल्यास पूनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल. पूनावाला यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितलेली नसताना केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवलेली आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवायची असेल तर त्यांच्या जीवाला धोका आहे? हे तपासून आणि संबंधित व्यक्तीने अर्ज केल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवली जाते; पण केंद्र सरकारने न मागताच पूनावाला यांना सुरक्षा दिली, यामागे नेमके काय राजकारण आहे? पूनावाला यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा पुरवली का? याचा खुलासा पूनावाला व केंद्र सरकारने केला पाहिजे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही वारंवार देशभर लसीकरणाची व्यापक मोहीम राबविली जावी, हीच भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टानेही लसीकरणाचे महत्त्व ओळखून केंद्र सरकारला सूचना केलेल्या आहेत. लसींच्या किमतीही समान असायला हव्या. तीन वेगवेगळ्या किमती कशा काय, हे एक मोठे गुपित आहे, यात कमिशनचा मुद्दा तर नाही ना, अशी शंका घेण्यास जागा आहे, असेही पटोले म्हणाले.