राज चिंचणकर, मुंबईनिसर्गकवी नलेश पाटील यांच्या पश्चात त्यांचा एकही स्वतंत्र काव्यसंग्रह नसल्याची चर्चा होत राहिली आणि साहित्य व सांस्कृतिक वर्तुळातून त्याबद्दल खंतही व्यक्त करण्यात आली, पण नलेश पाटील यांचा मित्रपरिवार असलेल्या ‘या मंडळी सादर करू या’ या चमूने मात्र, नलेश पाटील यांनी त्यांचा एक काव्यसंग्रह ‘मौज’ प्रकाशनाकडे प्रकाशनासाठी दिला असून, तो अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही, असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने या विषयाला कलाटणी मिळाली आहे. नलेश पाटील यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या पश्चात त्यांची शोकसभा घेऊ नये, असा त्यांचा आग्रह होता आणि त्याप्रमाणे त्यांच्या मित्रांनी त्यांची शोकसभा न घेता, ‘षौक’सभा आयोजित केली. नलेश पाटील यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या खेळकर आठवणी जागवणे, असा या सभेचा उद्देश होता. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये आयोजित याच सभेत, नलेश पाटील यांचे मित्र व ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी, नलेशचा एक काव्यसंग्रह गेली १० वर्षे ‘मौज’ प्रकाशनाकडे धूळ खात पडला असल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत, टीकास्त्र सोडले. नलेशचा हा संग्रह ‘मौज’कडून काढून घेऊन आपण, म्हणजे नलेशच्या मित्रमंडळींनी छापावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. नलेशचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, तर मराठी साहित्यातील ते बालकवींचे पुढचे पाऊल असेल, असा आशावादही त्यांनी या वेळी प्रकट केला. नलेश पाटील यांचे मित्र व ज्येष्ठ चित्रकार रघू कुल यांनीही अशोक बागवे यांच्या सूचनेला पाठिंबा देत, नलेशचा काव्यसंग्रह ‘मौज’कडून काढून घेऊ या, असे मत या वेळी व्यक्त केले. त्यामुळे नलेश पाटील यांच्या कथित काव्यसंग्रहाबद्दल त्यांची मित्रमंडळी व उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि हा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, अशी इच्छा या वेळी व्यक्त करण्यात आली. नलेशची पाटील यांच्या या ‘षौक’सभेत विचारार्थ आलेल्या या मुद्द्याबाबत मौज प्रकाशनाच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्याशी संपर्क साधला असता, नलेश पाटील यांचा असा कुठलाही काव्यसंग्रह ‘मौज’कडे आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे प्रकाशित करण्यासाठी ते काव्यसंग्रह देणार होते, परंतु शेवटपर्यंत त्यांच्याकडून तो काही आला नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
नलेशच्या काव्यसंग्रहाचा ‘षौक’ कुणाला...?
By admin | Published: October 06, 2016 4:00 AM