अमेरिकी व्हिसा मुलाखतीसाठी कोणाला उपस्थित राहण्याची गरज आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 01:05 PM2022-11-13T13:05:35+5:302022-11-13T13:06:04+5:30
US visa interview : ज्या नॉनइमिग्रंट व्हिसा अर्जदारांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय ७९ पेक्षा जास्त आहे, अशा अर्जदारांना सहसा व्हिसा मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.
नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणारी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मुलाखतीसाठी प्रत्यक्ष
उपस्थित राहण्याची गरज आहे का ?
सर्वसाधारणपणे, नाही. ज्या नॉनइमिग्रंट व्हिसा अर्जदारांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय ७९ पेक्षा जास्त आहे, अशा अर्जदारांना सहसा व्हिसा मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. अर्थात, त्यातही काही अपवाद आहेत. व्हिसा पात्रतेसाठी आवश्यक अशा अन्य गोष्टी जसे की सर्व आवश्यक कागदपत्रे, शुल्क ही सर्व वयोगटासाठी बंधनकारक आहेत. जर अर्जदार १४ वर्षांखालील असेल तर त्याला व्हिसा मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. त्या मुलाचे पालक किंवा गार्डियन यांच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा नसेल, तर त्यांना व्हिसा मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे. पालक किंवा कायदेशीर गार्डियन यांनी व्हिसा मुलाखतीला उपस्थित राहतेवेळी त्यांच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आणणे आवश्यक आहे. जर अर्जदार लहान मूल (मायनर) असेल आणि त्याच्या पालकांकडे अथवा कायदेशीर गार्डियनकडे अमेरिकेचा वैध व्हिसा असेल तर ते बालक ड्रॉपबॉक्स व्हिसासाठी पात्र ठरू शकेल. याकरिता मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ड्रॉपबॉक्स पात्रते संदर्भात अधिक माहितीसाठी http://www.ustraveldocs.com/in. येथे अधिक माहिती उपलब्ध आहे.
वय वर्षे १४ ते १७ या वयोगटातील मुलांना प्रत्यक्ष व्हिसा मुलाखतीसाठी यू.एस.कौन्सुलेटमध्ये येणे गरजेचे आहे. या मुलाखतीवेळी या मुलांसोबत त्यांच्या एका पालकाने किंवा कायदेशीर गार्डियनने येणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी स्वतःचे ओळखपत्र आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.
बहुतांश प्रकरणांत, जिथे अर्जदाराचे वय ७९ पेक्षा जास्त आहे त्यांना व्हिसाच्या मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. ते देखील ड्रॉप बॉक्स सुविधेसाठी पात्र होऊ शकतात. काहीवेळेस १४ वर्षांखालील आणि ७९ वर्षांवरील अर्जदाराल कौन्सिल ऑफिसर प्रत्यक्ष व्हिसा मुलाखतीसाठी बोलावू शकतात. उदाहरणार्थ, ज्या अर्जदारांचा नॉनइमिग्रंट व्हिसा यापूर्वी नाकारला गेला आहे, या सर्व वयोगटातील अर्जदारांना प्रत्यक्ष व्हिसा मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे.