मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील रस्त्यांची अवस्था तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न हा सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे. मुंबई महानगर पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टोळीने गेल्या २४ वर्षांत यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप करत मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणारे हे वाझे कोण, असा सवाल अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. आरटीआयमध्ये दाखल केलेल्या एका माहितीत महापालिकेने उत्तर देताना असे स्पष्ट केले आहे, की गेल्या २४ वर्षांत मुंबईकरांचे २१ हजार कोटी रुपये खड्ड्यांमध्ये खर्च केले आहेत.
या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः दाखल केलेल्या सुमोटो याचिकेत काही किंबहुना थातूरमातूर कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली असे म्हटले आहे. मात्र आजही आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईच्या रस्त्यांची दयनीय अवस्था असून, दरवर्षी मुंबईचे रस्ते हे खड्ड्यात जातात ही वस्तुस्थिती आहे. तुमचे -आमचे करदात्या मुंबईकरांचे २१ हजार कोटी रुपये खड्ड्यांत गेले; मात्र रस्त्यांची अवस्था आहे तशीच आहे, अशी टीका त्यांनी केली.