महिलेला उत्तर देणार नाही, पण वेळ आली तर...; अमृता फडणवीस यांच्या टिप्पणीवर मलिक बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:53 AM2021-11-10T10:53:56+5:302021-11-10T22:59:40+5:30
Nawab Malik allegation on Devendra Fadnavis: नवाब मलिक करत असलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी ट्विटवरुन टोला लगावला होता.
मुंबई – मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहेत. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचा पुरावा फडणवीसांनी मांडला. त्यानंतर मलिकांनी फडणवीसांविरोधात हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं. त्यानुसार मलिकांनी राज्यात बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांनी संरक्षण दिल्याचं म्हटलं.
नवाब मलिक करत असलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी ट्विटवरुन टोला लगावला होता. त्यावर बोलताना नवाब मलिकांनी मी कुठल्याही महिलेला उत्तर देणार नाही. तुमचीही काळी संपत्ती मी वेळ आल्यावर काढणार आहे. वरळी इथं २०० कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे. बीकेसीतील फ्लॅट कोणाला राहायला दिला आहे. बेनामी संपत्तीबाबत तपास करायचा असेल तर मी कागदपत्रे द्यायला तयार आहे याबाबत आगामी काळात सांगेन असा इशारा मलिकांनी अमृता फडणवीसांना दिला आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन मलिकांविरोधात भाष्य केले होते. त्या म्हणाल्या की, वारंवार प्रेस कॉन्फरन्स बोलावली परंतु प्रत्येक खोटं आणि बनावट गोष्टी बाहेर काढल्या. नवाब मलिकांचं केवळ एकच लक्ष्य आहे ते म्हणजे त्यांना जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे. बिगडे नवाब म्हणून अमृता फडणवीसांनी त्यांना टार्गेट केले होते. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी मलिकांना जोरदार प्रहार केले होते. सरळ मार्गाने जाणाऱ्या महिलांना का डिवचता, तेच आज माझ्यासोबत केलं जातंय. तुम्ही मर्द आहात ना मग देवेंद्रजींना डायरेक्ट टार्गेट करा, मला मध्ये नका आणू. माझ्या अंगावर कुणी आलं तर, मी सोडणार नाही. मी एज ए सोशल एक्टीव्हीस्ट म्हणून माझे विचार प्रकट करत असते. आणि ते यापुढेही करत राहणार असेही अमृता फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं होतं.
नवाब मलिकांनी काय आरोप केले?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं. रियाज भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाज भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.