मुंबई : वर्षभरापासून कोरोनामुळे बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई थंडावली आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रुप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघातही होत आहेत.
कित्येक इमारतींच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला इतकेच नव्हे; तर फूटपाथवरही अशी वाहने आढळतात. या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने माखलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो.
कोरोनापूर्वी पालिकेने बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम अतिशय वेगवान केली होती. मात्र, ही मोहीम आता थंडावली आहे. अनेकदा पालिका आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे या वाहनांना वाली कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
पालिकेने अनधिकृत पार्किंगविरोधात मोहीम सुरू केली होती. मात्र, पुढे त्या वाहनांवर कोणतीच कारवाई झाली नाही. कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र रस्त्याच्या कडेला बेवारस वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.
- जगदीश म्हात्रे, वडाळा
अनेक वेळा ही वाहने कोणाची आहेत ? ती मोकळ्या जागेवर कशी आली? याविषयी रहिवाशांना काहीच माहीत नसते. याबाबत पालिकेने कारवाईची गरज आहे.
- अभिषेक माने, रहिवासी, दादर
अनेक महिने ही वाहने एकाच जागेवर असतात. पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रार करा, असे उत्तर पालिकेचे काही कर्मचारी देतात.
- रमेश पठारे, चेंबूर
बहुतांश वेळेला अनेक गाडीमालक आपली वाहने रस्त्यावर टाकून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असतो. याबाबत तक्रार आल्यास वाहतूक पोलीस ते वाहन जमा करून घेतात. त्या वाहनाचा मालक आल्यास दंड आकारून वाहन सोडले जाते. कोणी मालक न मिळण्यास ती वाहने पालिकेकडे देण्यात येतात.
वरिष्ठ अधिकारी, वाहतूक विभाग
बेवारस वाहनांवर पूर्वी पालिकेकडून कारवाई करण्यात येत होती. मात्र, वाहतूक विभागाच्या सहपोलीस आयुक्तांशी बैठक झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस त्या वाहनांवर कारवाई करतात. जागा पालिका उपलब्ध करून देते, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.