मुंबई : राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट झालेला असून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. हे रोखण्यासाठी जागतिक आरोग्य दिनाचे (७ एप्रिल) औचित्य साधून महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तपासण्या करण्यास सांगतात, लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो. तपासणी झाल्यावर, ते सांगतील त्यावेळी रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो. पण, यामध्ये पॅथॉलॉजी लॅब कोणाची आहे, डॉक्टरांची नोंदणी आहे की नाही, अशी कोणतीही चौकशी कोणीच करत नाही. यामुळे अनेकांची फसवणूक होते. ही टाळण्यासाठीच असोसिएशनने व्हॉट्सअॅप, ई-मेल, सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पॅथॉलॉजिस्ट कोण? टेक्निशियन कोण? यातील फरक मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने समजावून देण्यात येणार आहे. एमबीबीएस पूर्ण केल्यावर एमडी/ डीसीपी / डीएनबी / डीपीबी याचे शिक्षण घेतलेली व्यक्तीच पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकते. स्वत:च्या डॉक्टरला नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टकडेच तपासणीसाठी पाठवण्याचा आग्रह धरा, तपासणीसाठी नमुना देण्याआधीच लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट आहे की नाही हे पाहा, पॅथॉलॉजिस्टचा नोंदणी क्रमांक पाहा, याची फेरतपासणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अथवा मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी क्रमांक तपासा, असे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
पॅथॉलॉजिस्ट कोण?
By admin | Published: April 08, 2015 3:32 AM