- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्यरात्रीची वेळ, सगळीकडे शांतता. त्यात एक परिचारिका मोबाइलमध्ये सिनेमा पाहण्यात व्यस्त असताना कोणीतरी येत असल्याची चाहूल झाली. तिने दरवाजाकडे पाहताच एका अनोळखी व्यक्तीशी तिची नजर पडली. त्याला पाहून परिचारिकेची बोबडी वळली. तिने घाबरून मैत्रिणीला उठविले, घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्यांनी बाहेर बघेपर्यंत तो दिसेनासा झाला. भाटिया रुग्णालयाच्या परिचारिकांच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे. सध्या ती अनोळखी व्यक्ती कोण होती? चोर, माथेफिरू का कुणाचा मित्र या दिशेने ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहेत.ताडदेव येथील आदम महल या वसतिगृहात हा प्रकार घडला. भाटिया रुग्णालयाने भाडे तत्त्वावर हे वसतिगृह घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तक्रारदार परिचारिका मोबाइलमध्ये चित्रपट पाहत होती. अचानक तिला कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तिने दरवाजाकडे पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती आत शिरत असल्याचे तिच्या लक्षात आले.ती व्यक्ती कोण आहे? चोर की भूत? अशा नानाविध विचारांनी ती घाबरली. समोरच्या व्यक्तीशी तिची नजर भिडली. त्यामुळे भीतीने तोंडातून शब्दही फुटत नव्हते. अखेर तिने धाडस करून मैत्रिणीला उठवून घडलेला प्रकार सांगितला आणि दरवाजाकडे पाहणार तोच ती व्यक्ती पसार झाली.मैत्रिणीनेही भास झाला असावा, असे सांगून झोपी गेली. मात्र इथे अनोळखी व्यक्तीला पाहून झोप उडाल्याने ती परिचारिका रात्रभर जागी होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराचा लॅचही तुटलेला दिसला. त्यामुळे परिचारिकेच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले. तिने वसतिगृहाच्या प्रमुखांना याबाबत कळविले आहे. त्यानंतर सोमवारी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी ४५६ कलमांतर्गत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वसतिगृहाला रात्रीच्या वेळेस आतून लॅच लावण्यात येते. त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे? ती आत कशी शिरली? ती आधीपासूनच हॉस्टेलमध्ये होती का? ती व्यक्ती चोर की कुणाचा मित्र ? अशा सर्व बाजूंनी पोलीस अधिक तपास करत आहेत. वसतिगृहाच्या जवळच बार आहे.तेथून कोणी आले होते का? या दिशेनेही त्यांचा तपास सुरू आहे. वसतिगृहात सीसीटीव्ही नाही. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्हीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली.
गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरलेली ‘ती’ व्यक्ती कोण? मध्यरात्री रंगला थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 4:28 AM