निधी वाटपात कोणी टाकलाय खडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 03:08 AM2021-03-06T03:08:25+5:302021-03-06T03:08:39+5:30

कपातीवरून काँग्रेस - भाजपमध्ये खडाजंगी

Who put the stone in the distribution of funds? | निधी वाटपात कोणी टाकलाय खडा?

निधी वाटपात कोणी टाकलाय खडा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विभाग स्तरावरील विकास कामांसाठी स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय गटनेते व २३२ नगरसेवकांना ६५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.  प्रत्यक्षात ९७५ कोटी रुपये मंजूर झाले असताना आयुक्त इकबालसिंह चहल यांनी त्यात अडीचशे कोटी रुपयांची कपात केली. पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने निधीमध्ये कपात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. तर ही कपात नेमकी कोणामुळे झाली? यावरून भाजप - काँग्रेसमध्येही आता बाचाबाची होऊ लागली आहे.  


स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभागातील कामाबाबत भाजपचे विनोद मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या तक्रारीमुळे आयुक्तांनी निधीमध्ये कपात केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. मात्र एका पक्षाच्या गटनेत्याने फोन करून निधीत कपात करण्यास सांगितल्याने स्थायी समितीला मिळणाऱ्या निधीत २५० कोटींची कपात झाली आहे. त्या गटनेत्याचे नाव मी चार दिवसांनी जाहीर करीन, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी शुक्रवारी स्थायी समितीत केला.

 
शिरसाट यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र ते विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना उद्देशून बोलत असल्याची चर्चा रंगत आहे. विरोधी पक्ष नेते यांनी देखील भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करीत खोटे बोला पण रेटून बोला अशी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला. निधी वाटपाबाबत आयुक्तांशी सर्व गटनेत्यांची चर्चा झाल्यानंतर काय झाले? आयुक्तांनी निधीत कपात का केली? याची माहिती नाही. मात्र काँग्रेसला भाजपपेक्षाही जास्त निधी मिळाल्याने शिरसाट यांना पोटदुखी झाल्याचा टोला रवी राजा यांनी लगावला.

निधीमध्ये कपात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या जिव्हारी
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने निधीमध्ये कपात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. तर ही कपात नेमकी कोणामुळे झाली? यावरून भाजप - काँग्रेसमध्येही आता बाचाबाची होऊ लागली आहे.  

Web Title: Who put the stone in the distribution of funds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.