रेल्वेच्या जमिनीवरील ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी लावले? महापालिकेचे ठेवले कानावर हात, बॅनरमाफियांचे वाढले अतिक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 04:38 IST2025-04-03T04:37:35+5:302025-04-03T04:38:26+5:30
Indian Railway News: मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर ३०६ होर्डिंग्ज आहेत. त्यांपैकी मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९, तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. मात्र, यापैकी किती होर्डिंग कोणी लावले, याची माहितीच मुंबई महापालिकेकडे नाही.

रेल्वेच्या जमिनीवरील ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी लावले? महापालिकेचे ठेवले कानावर हात, बॅनरमाफियांचे वाढले अतिक्रमण
मुंबई - मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर ३०६ होर्डिंग्ज आहेत. त्यांपैकी मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९, तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. मात्र, यापैकी किती होर्डिंग कोणी लावले, याची माहितीच मुंबई महापालिकेकडे नाही.
मध्य रेल्वेवरील १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १३७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी लावले आहेत याची माहिती महापालिकेकडे नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. त्यांनी महापालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षक कार्यालयाकडे शहरातील होर्डिंग्ज संदर्भातील विविध माहिती मागितली होती. त्यानुसार, अनुज्ञापन अधीक्षक कार्यालयाने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या जमिनीवरील होर्डिंग्जची आकडेवारी उपलब्ध करून दिली.
पालिकेला माहिती नाही
पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील १२७ होर्डिंग्ज आहेत. त्यांत ए वॉर्डात ३, डी वाॅर्डात १, जी दक्षिण २, जी उत्तर १२, के पूर्व २, के पश्चिम १, पी दक्षिण १० तर आर दक्षिणमध्ये ४ होर्डिंग्जचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७८ होर्डिंग्ज आहेत. त्यांत ई वॉर्डात ५, एफ दक्षिण वॉर्डात १०, जी उत्तर वॉर्डात २, एल वॉर्डात ९ आणि टी वॉर्डात ४२ अशा ६८ होर्डिंग्जचा समावेश आहे. मात्र ते कोणाचे आहेत, याचाही पत्ता पालिकेला नाही.
होर्डिंग्जची नियमित तपासणी : प. रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात सध्या १२६ होर्डिंग्जचे संरचना आहेत. त्या सर्व पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर आहेत.
जाहिरातदारांना या साइट्स भाडेतत्त्वावर देण्यासाठी सात टप्प्यांची मंजुरी प्रक्रिया आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेकी यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या आदेशाचे रेल्वे पालन करते. होर्डिंग्जची नियमित तपासणी करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा कार्यरत आहे.
जाहिरात एजन्सीज ठरावीक कालावधीनंतर करार आणि निविदा अटींनुसार बदलत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार चालते, याची खात्री केली जाते.