‘लेटर बाॅम्ब’ने उडवली खळबळ : आरोपांसंदर्भातील दोघांच्या पत्रात मोठी विसंगती
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग आणि एनआयएच्या अटकेतील निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या ‘लेटर बॉम्ब’ने पोलीस दलाबरोबर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना त्यांच्या आरोपातील विसंगती चर्चेचा नवीन विषय बनला आहे. दोघांनीही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असले तरी त्यामध्ये मोठी विसंगती आहे. त्यामुळे कोणाचे आरोप खरे आणि कोण खोटे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी गृहमंत्री देशमुख आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. एकवेळ ते ग्राह्य धरले तरी परमबीर सिंग खरे बोलत आहेत, की वाझे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासानंतरच समाेर येणार आहे.
परमबीर सिंग यांनी २० मार्चला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा केला असताना बुधवारी व्हायरल झालेल्या वाझेच्या कथित पत्रामध्ये वसुलीच्या टार्गेटचा उल्लेख नाही. शिवाय त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये फरक असल्याने समाेर आले आहे.
* दोघांच्या पत्रामधील प्रमुख विसंगत बाबी अशा :
- परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला फेब्रुवारीच्या मध्यावर बोलावून महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे नमूद केले आहे. वाझेच्या पत्रामध्ये या रकमेबद्दल कसलाही उल्लेख नाही, तर प्रत्येक बारमधून सरासरी तीन ते साडेतीन लाख वसूल करावे, असे म्हटले आहे शिवाय जानेवारीत गृहमंत्र्यांना भेटल्याचे नमूद केले आहे.
- वाझेने गेल्यावर्षी जुलै/ऑगस्टमध्ये अनिल देशमुख यांनी दाेन कोटींची मागणी केली होती, असे म्हटले आहे, तर परमबीर सिंग यांच्या पत्रात मात्र त्याचा उल्लेख नाही.
- वाझेने अनिल परब यांनी ‘सैफी’च्या ट्रस्टीकडून ५० कोटी, तर ५० ठेकेदारांकडून प्रत्येकी दोन कोटी वसूल करण्यास सांगितल्याचे पत्रात लिहिले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात असा कुठलाच उल्लेख नाही.
- परमबीर सिंग यांनी वाझेच्या गृहमंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीवेळी त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि अन्य एक, दोन स्टाफ असल्याचे म्हटले आहे तर वाझेच्या पत्रात पलांडेचा उल्लेख नाही. बारमधून वसुलीचा विषय काढण्यात आला, त्यावेळी देशमुख यांचे पीए कुंदन हजर असल्याचे लिहिले आहे.
.............................