आइस्क्रीम कोनामध्ये सापडलेलं बोट नेमकं कोणाचं?; धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:48 PM2024-06-19T13:48:35+5:302024-06-19T13:49:25+5:30

ज्या कंपनीत हे आइस्क्रीम बनवण्यात आले होते, त्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

Who really owns the boat found in the ice cream corner Shocking information revealed | आइस्क्रीम कोनामध्ये सापडलेलं बोट नेमकं कोणाचं?; धक्कादायक माहिती उघड

आइस्क्रीम कोनामध्ये सापडलेलं बोट नेमकं कोणाचं?; धक्कादायक माहिती उघड

मुंबई : मुंबईतील मालाड इथं एका आइस्क्रीमच्या कोनामध्ये मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आइस्क्रीममध्ये मानवी बोट गेले कसे, याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात असून याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या कंपनीत हे आइस्क्रीम बनवण्यात आले होते, त्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याचेच बोट आइस्क्रीम कोनात गेल्याची शंका पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

जखमी कर्मचाऱ्याबाबत संशय आल्यानंतर पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतर हे बोट नक्की कोणाचे होते, याची नेमकी माहिती समोर येणार आहे.

कोणत्या कंपनीने केले आइस्क्रीमचे उत्पादन?

मुंबईतील मालाड येथे आइस्क्रीमच्या कोनात सापडलेल्या मानवी बोटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्युन डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, डेअरी सील करण्यात आलेली नाही. मालाड येथे यम्मो कंपनीच्या आइस्क्रीममध्ये मानवी हाताच्या बोटाचे पेर सापडल्याचा  खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गाजियाबाद येथील ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमधील फॉर्च्युन डेअरीकडून आइस्क्रीम बनवून घेत होती, असे समोर आले आहे.
 
डेअरीचे भागीदार व संचालक सचिन जाधव म्हणाले, फॉर्च्युन डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन करते. दुधापासून भुकटी व बटर बनवण्यात येते. १६ सप्टेंबर २०२३ पासून आमची कंपनी यम्मो कंपनीचे आइस्क्रीम बनवण्याचे काम करत आहे. ती कंपनी गाजियाबाद येथून हे आइस्क्रीम बनवून घेते. सदर कंपनीवर १२ जून २०२४ रोजी तक्रार झालेली आहे. 

दरम्यान, "या प्रकरणातील यम्मो ही आइस्क्रीम बनवणारी कंपनी आहे. ते अनेक कंपन्यांकडून आइस्क्रीम बनवून घेते. तसेच हडपसर येथील वाल्को इंडस्ट्रीजकडून आइस्क्रीम बनवून घेत असल्याने तेथील काही नमुने घेतले आहेत. इंदापूरसह इतरही काही युनिट आहेत. त्यांना एफएसएसआयने परवानगी दिली आहे," अशी माहिती एफडीए (अन्न विभाग) पुणे विभाग येथील सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली आहे.

Web Title: Who really owns the boat found in the ice cream corner Shocking information revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.