मुंबई : गोवंडी भागातील महापालिकेच्या संजयनगर उर्दू शाळेतील मुलांना विषबाधा होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार केवळ आदेश काढून मोकळे होते, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, असा सवाल मुख्याध्याकांनी केला आहे.आरोग्य विभाग तसेच शालेय शिक्षण विभागाने यात समन्वय साधत विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा पुरवली पाहिजे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, असे म्हणणे शाळांचे आहे. शाळेत आल्यानंतर मुलांना पोटात मळमळ होते, उलट्या होतात. शिक्षकांना पालकांना फोन केल्याशिवाय उपाय नसतो. वैद्यकीय सेवा पुरवण्याइतपत सक्षम यंत्रणा सरकारकडून केली गेलेली नाही, अशी तक्रारही शाळांची आहे.येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ९ महिने ते १५ वर्षांपर्यंत सर्व मुलांसाठी हे लसीकरण आहे. राज्यात एकूण लाभार्थी ३० लाख ५० हजार आहेत. त्यापैकी लाभार्थी हे शाळेत जाणारे २० लाख आहेत. त्यामुळे या लसीकरणाबाबतचे प्रशिक्षण राज्यभरात मुख्याध्यापक, शाळांचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष, शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. याची कार्यशाळा मुंबईतही पालिकेच्या आरोग्य विभागाने आयोजित केली. मात्र या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आरोग्य विभागाला नाहीच अशी, तक्रार आहे.याबाबत शनिवारी मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. जर वैद्यकीय अधिकारी स्वत: उपस्थित नसतील तर अशा कोणत्याही योजना शाळाप्रमुख राबविणार नाहीत. तसेच शाळेचे कार्य विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करणे आहे. मात्र ही शाळाबाह्य कामे लादली जात आहेत, असा आरोप मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:21 AM