"३१० किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणाची?"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:02 AM2020-08-11T02:02:19+5:302020-08-11T02:02:28+5:30
केंद्रीय पुरतत्त्व विभागाच्या यादीत ३६ किल्ले आहेत. मग उर्वरित ३१० किल्ल्यांची जबाबदारी नक्की कोणाची? असा सवाल गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन याविषयी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रचे संस्थापक श्रमिक धन्वंतरी यांनी केला.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस सुमारे ३७०० गडकोट स्वराज्यात होते. आज ते किल्ले महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये विभागले गेले आहेत.
पुरातत्त्व विभागाकडे महाराष्ट्रातील ४२ किल्ल्यांची यादी होती. गडसंवर्धन चळवळीमुळे त्यात ६ किल्ल्यांची भर पडली. केंद्रीय पुरतत्त्व विभागाच्या यादीत ३६ किल्ले आहेत. मग उर्वरित ३१० किल्ल्यांची जबाबदारी नक्की कोणाची? असा सवाल गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन याविषयी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रचे संस्थापक श्रमिक धन्वंतरी यांनी केला.
स्वतंत्र्य वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानमालेत ते बोलत होते. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो हा या व्याख्यानमालेचा विषय होता. ते म्हणाले की, सह्याद्रीच्या शिखरांमध्ये गड-किल्ले दिमाखात उभे आहेत. या किल्ल्यांच्या आधारानेच शिवरायांनी परकीय आक्रमण व धर्मांधांना नामोहरम केले होते. मात्र आता या गडकिल्ल्यांची पडझड सुरू आहे.
सीमेच्या पलीकडे असणाºया किल्ल्यांना ही संजीवनी दिली पाहिजे. यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत, त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. आज अनेक किल्ल्यांतील बुरूज व आतील भाग यांची पडझड होत आहे. गडांवरील प्रत्येक दगड आपल्यासाठी पवित्र आहे त्यासाठी आपण कार्य करायला हवे. गड-किल्ल्यांच्या जतनासाठी नागरिकांनी आर्थिक मदत करायला हवी.
किल्ल्यांवरील ढासळलेल्या वास्तू छायाचित्रित करून संबंधित विभागाला माहिती देणे गरजेचे आहे. हे काम प्रत्येकाने करायला हवे किल्ले संवर्धन झाले तरच पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराजांचे चरित्र समजू शकेल. राजस्थानातील अनेक गडकोट वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहेत. परंतु महाराष्ट्रातील एकही किल्ला वर्ल्ड हेरिटेज मध्ये नाही जर किल्ल्यांचे योग्यरीत्या संवर्धन केले आपले किल्ले जागतिक वारसा म्हणूनच गणले जातील. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात गड-किल्ल्यांचा मोठा वाटा आहे. गडकोट हे राष्ट्रीय अस्मितेचे आणि हिंदूंच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण झालेच पाहिजे.
‘संस्थांना प्रोत्साहन द्या’
आज अनेक किल्ल्यांतील बुरूज व आतील भाग यांची पडझड होत आहे. गडांवरील प्रत्येक दगड आपल्यासाठी पवित्र आहे त्यासाठी आपण कार्य करायला हवे. गड-किल्ल्यांच्या जतनासाठी नागरिकांनी आर्थिक मदत करायला हवी. यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील
आहेत त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे़