प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:49 PM2019-11-23T20:49:10+5:302019-11-23T21:04:04+5:30
दोषींवर कठोर कारवाई करण्याची अमित ठाकरे यांनी केली मागणी.
मुंबई: सर्व राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही थराला जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मात्र आज आपल्यातील संवेदनशीलतेचं, माणुसकीचं दर्शन घडवलं. प्रिन्स राजभर या दोन-तीन महिन्यांच्या बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेऊन केली.
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या राजभर कुटुंबातील प्रिन्स नावाचा दोन महिन्यांचा मुलगा केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला होता. रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात ७ नोव्हेंबर रोजी ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत प्रिन्स गंभीर जखमी झाला. त्याचा डावा हात भाजल्यामुळे तो हात सोमवारी शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी मध्यरात्री प्रिन्सचं हृदय बंद पडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना केईएम रुग्णालयासाठी निश्चितच लाजीरवाणी आहे असं मत अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
"ह्या संपूर्ण प्रकरणात रुग्णालयातील हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे. तरी प्रिन्सबाबत घडलेल्या दुर्घटनेची तसंच त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची अत्यंत आग्रहाची मागणी आहे. आपलं रुग्णालय प्रत्येक लहान-मोठ्या नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी वचनबद्ध आहे, हा संदेश समाजात जावा ह्यासाठी दोषींवर तत्काळ कारवाई होणं अत्यावश्यक आहे" असंही अमित ठाकरे म्हणाले. अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख ह्यांच्या भेटीस गेलेल्या मनसेच्या शिष्टमंडळात मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
प्रत्येक नागरिकाचा जीव अमूल्य आहे!
" केईएमसारख्या रुग्णालयात महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांवर अतिरिक्त ताण पडत असला तरी प्रत्येक रुग्णावर उपचार करणं, त्याला बरं करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रिन्स राजभरच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे १० लाख रुपये देऊन पालिका किंवा रुग्णालय प्रशासन आपली ही जबाबदारी झटकून टाकू शकत नाही. महाराष्ट्रीय असो वा उत्तरभारतीय, प्रत्येक नागरिकाचा जीव अमूल्य असल्याचे मत अमित ठाकरे यांनी सांगितले.