Join us

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

मुंबई : नेत्यांचे वाढदिवस, विविध सण उत्सव, तसेच राजकीय पक्षांचे अनेक कार्यक्रम असले की, शहरांमधील चौकाचौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग लावले ...

मुंबई : नेत्यांचे वाढदिवस, विविध सण उत्सव, तसेच राजकीय पक्षांचे अनेक कार्यक्रम असले की, शहरांमधील चौकाचौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग लावले जातात. जागा दिसेल, तिथे हे अनधिकृत होर्डिंग लावले जात असल्याने शहर विद्रुप बनत चालले आहे. अनेकदा हे होर्डिंग पथदिव्यांच्या आड किंवा सिग्नल समोर लावले जातात. वाहन चालकांना सिग्नल पाहताना या अनधिकृत होर्डिंग्जचा अडथळा जाणवतो. पथदिव्यांचा उजेड या होर्डिंगमुळे अडला जातो. हे होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करते की नाही, असा प्रश्न अनेकदा सामान्यांना पडतो.

या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?

मुंबईत काही चौकांमध्ये हमखास अनधिकृत होर्डिंग आढळून येतात. जसे सायन-पनवेल मार्गावरील चेंबूर नाका, खोदादाद सर्कल, परळ टी टी, घाटकोपर श्रेयस सिग्नल अशा मुंबईतील अनेक ठिकाणी दररोज अनधिकृत होर्डिंग लागलेले दिसून येतात. मात्र, येथे होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई केली जाते की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

वर्षभरापासून कारवाई नाही

शहरात अनेक ठिकाणी पदपथांवर विजेच्या खांबांवर झाडांवर इमारतींवर वर्षानुवर्षे विविध जाहिरातींचे, तसेच राजकीय नेत्यांचे होर्डिंग लागलेले असतात. मात्र, त्यांच्यावर वर्षभर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्वांना प्रशासनाच्या कारवाईचे भय राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

काय होऊ शकते कारवाई?

होर्डिंग लावण्याची परवानगी न घेताच ते लावल्यास प्रशासन ते होर्डिंग जप्त करते. त्याचप्रमाणे, ते होर्डिंग ज्याने लावले आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जेवढे दिवस ते होर्डिंग लावले होते, तेवढ्या दिवसांचा दंड वसूल करण्यात येतो.

पालिकेची करडी नजर

अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यावरही पालिका संबंधित ठिकाणी जाऊन ते होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करत आहे.

स्टार ११५७,