झाडे छाटणी करताना पक्ष्यांच्या पक्षाघाताला जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:10 AM2021-08-20T04:10:03+5:302021-08-20T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल स्कीम मुख्य रस्ता याठिकाणी असलेल्या व्रजभुवन व आशिक अपार्टमेंट यामधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल स्कीम मुख्य रस्ता याठिकाणी असलेल्या व्रजभुवन व आशिक अपार्टमेंट यामधील रस्त्यावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या सांगण्यानुसार करण्यात आली. येथील झाडे कापताना झाडांवरील पक्ष्यांच्या पक्षाघाताला जबाबदार कोण, असा सवाल विलेपार्ले येथील सामाजिक कार्यकर्ते समीर काळे यांनी समाजमाध्यमावरून केला आहे.
मुळत: झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याआधी झाडांचे सर्वेक्षण करणे कंत्राटदाराला क्रमप्राप्त असते. मेसर्स ॲक्युट डिझाइन या कंत्राटदाराला के पूर्व विभागाच्या उद्यान विभागाशी संबंधित असलेले कंत्राट देण्यात आलेले आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी करत असताना त्यावर असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांची तसेच घरट्यांमधील पक्षांच्या अंड्यांची त्याचप्रमाणे झाडावरील पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या ढोल्यांची योग्य ती काळजी घेऊन प्रसंगी त्यांना स्थलांतरित करून झाडाच्या फांद्यांची छाटणी करणे क्रमप्राप्त होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. लवकरच याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दि. १२ रोजी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे एकही जबाबदार अभियंता संबंधित घटनास्थळी उपस्थित नसताना भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बेदरकारपणे झाडाच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या घटनेत दोन घरट्यांची तसेच दोन पक्ष्यांच्या ढोल्यांची मोडतोड करण्यात आली. कावळ्याच्या घरट्यातील दोन अंड्यांचीसुद्धा मोडतोड झाली. पक्ष्यांचा मोठ्या स्वरूपात पक्षाघात झाला. सायंकाळी सूर्यास्तानंतर पक्षी घरट्याकडे वळल्यावर त्यांना त्यांची घरटी व अंडी दिसली नाहीत. सर्व पक्षी याठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेत पालिकेच्या आणि कंत्राटदाराच्या तांडवाकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिली.
या संपूर्ण कारवाईला सक्त विरोध केला भरपावसात तीन तास रस्त्याच्या मधोमध बसून झाड व त्यावरील घरटी यांना वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला.
समीर काळे यांनी महानगरपालिकेच्या अभियंते व कंत्राटदारांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात तक्रार केली.
दि. १३ रोजी झाडे कापण्याच्या कारवाईला विरोध करून निसर्गाने दिलेले झाड व झाडावरील पक्ष्यांच्या घरट्यांना घरट्यातील अंड्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता आपल्या विरोधात संबंधित अधिकारी व कंत्राटदाराने लेखी स्वरूपात तक्रार केल्यावर त्यांच्यावर विलेपार्ले पोलिसांनी कलम ७०७ दखलपात्र गुन्हा दाखल केला, अशी माहिती समीर काळे यांनी दिली.