नेरळचा सरपंच कोण?
By admin | Published: December 5, 2014 12:18 AM2014-12-05T00:18:38+5:302014-12-05T00:18:38+5:30
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेरळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीने बहुमत मिळविले आहे,
नेरळ : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेरळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीने बहुमत मिळविले आहे, मात्र सरपंचपदाच्या निवडणुकीत बहुमत असूनही राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंच राष्ट्रवादी - कॉंग्रेसचा की शेकापचा याकडे लक्ष लागले असताना नेरळमधील राजकीय अस्थिरमुळे तणाव निर्माण झाला आहे.
१७ सदस्य असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस - शेकाप - स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीने ११ जागा जिंकत बहुमत मिळविले, त्यात ७ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर ४ सदस्य शेकापचे आहेत. अन्य सदस्यांमध्ये मनसेचे दोन, रिपाइंचा एक, शिवशाही आघाडीचे दोन आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आले आहेत. मागास प्रवर्गातील महिला सदस्यांसाठी नेरळचे सरपंचपद आरक्षित आहे.
निवडणुकीत या प्रवर्गाच्या राखीव जागेवर राष्ट्रवादीकडून राजश्री कोकाटे, सुवर्णा नाईक आणि खुल्या जागेवर कौसर सहेद या विजयी झाल्या, तर मनसेच्या सुवर्णा मोरे आणि शिवशाही आघाडीच्या जान्हवी साळुंखे विजयी झाल्या आहेत, तर खुल्या गटातून शेकापच्या संजीवनी हजारे विजयी झाल्या. राष्ट्रवादी -शेकाप आघाडीकडे आरक्षित जागेवरील दोन आणि अन्य दोन असे चार उमेदवार सरपंच होऊ शकतात, त्यामुळे आघाडीच्या सरपंचपदाच्या सत्तावाटपात चारही सदस्यांना खूश ठेवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. यात पहिला सरपंच कोण यावर राजकीय वातावरण तंग झाले आहे. (वार्ताहर)