लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकच्या ड्रग प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख असताना त्याला अटक झाली होती. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलिसकोठडी दिली. मग, न्यायालयीन कोठडी दिली. त्यावेळी त्याची चौकशी झालेली नसूनही तत्कालिन गृह खात्याने पोलिस कोठडीसाठी न्यायालयाकडे अर्ज का केला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.
फडणवीस म्हणाले, ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. त्या काळात उद्धव ठाकरेंनी त्याला नाशिक शिवसेनेचा प्रमुख केले होते. त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पण, त्याला लगेच ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याची चौकशीच झालेली नाही. यासाठी कुणी दबाव आणला? तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी की गृहमंत्र्यांनी? आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. पण, आज त्या सांगणार नाही.
तुम्हीच ठरवा...ललित पाटीलप्रकरणी दोन मंत्र्यांच्या नार्को टेस्टची मागणी विरोधकांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, मी जो घटनाक्रम आता सांगितला आहे, त्यावरून नार्को टेस्ट कोणाची करायला हवी, ते तुम्हीच सांगा.