Join us

कोण म्हणतेय, मुख्य रस्ते खड्ड्यात आहेत?

By admin | Published: July 16, 2014 1:09 AM

एकीकडे तलाव क्षेत्रात पाण्याची पातळी खालवत असल्याने मुंबईकरांवर पाणी संकट कोसळले आहे़ त्याचवेळी मुंबईत मुसळधार पावसाने रस्त्यांचे तोंड फोडले आहे़

मुंबई : एकीकडे तलाव क्षेत्रात पाण्याची पातळी खालवत असल्याने मुंबईकरांवर पाणी संकट कोसळले आहे़ त्याचवेळी मुंबईत मुसळधार पावसाने रस्त्यांचे तोंड फोडले आहे़ परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी खड्डे असून मुख्य रस्त्यांवर खड्डेच नाहीत, असा दावा पालिका प्रशासनाने आज महासभेत केला़ मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने प्रशासनाची तळी उचलत पाणी समस्या आणि खड्डेप्रकरणी जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षांना गप्प करण्याचा प्रयत्न केला़पाणीटंचाईच्या काळात मुंबईची तहान भागविण्यासाठी पालिकेकडे कोणतीच पर्यायी उपाययोजना नाही़ तसेच मुसळधार पावसात रस्तेही उखडले असून मुंबई खड्ड्यात गेली आहे़ या गंभीर प्रश्नावर पालिका सभागृहात निवेदन करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले़ पावसाळ्यात मुंबईकरांना कशा प्रकारे दिलासा देण्यात येईल, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला़यावर स्पष्टीकरण देताना पावसाळ्यात गढूळ पाण्याच्या तक्रारी काही ठिकाणी आहेत, तर खड्डे बुजविण्याचे आदेश विभाग कार्यालयांना देण्यात आले, असल्याचे मोघम उत्तर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिले़ मात्र सध्या मुंबईत दिसणारे खड्डे हे छोट्या रस्त्यांवर असून मुख्य रस्त्यांवर खड्ड्ेच नाहीत, असा अजब दावाही त्यांनी केला़ गतवर्षी मुंबईत नऊ हजार ८०० खड्ड्यांची नोंद झाली होती़ तर यंदा १९५० खड्डे पडले आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ (प्रतिनिधी)