यदु जोशी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं की आरोग्य सेवेतील निवृत्त डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सेवा द्यायला पुढे यावं. त्याकरता त्यांनी आॅनलाईन नोंदणी करण्याचं आवाहनही केलं. काय आश्चर्य! केवळ ७२ तासांत १५,५०० अर्ज आले. मुख्यमंत्र्यांनी सेवानिवृत्तांना आवाहन केलं, पण प्रतिसाद तिशीतल्या डॉक्टरांकडून, नर्सेसकडूनही मिळाला. अनेक जण सध्याची नोकरी सोडून यायला तयार आहेत. कोरोनाची सर्वाधिक झळ मुंबईला बसतेय. मुंबईत कोणी कोणाचं नसतं अशी चर्चा होते, पण अशा संकटाच्या काळात मुंबईकरांच्या सेवाभावी वृत्तीचं दर्शन घडतंय. असंघटित कामगार, मजूर, फुटपाथवर जगणारे लोक, एकाकी आयुष्य जगणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करणारे शेकडो हात समोर आले आहेत.
सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आर्ट आॅफ लिव्हिंग, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, जीवन विद्या मिशन, भारत विकास परिषद, राजस्थानी सेवा संघ, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, गुरुद्वारा अशा एक ना अनेक संस्थांनी या कार्यात झोकून दिलंय. शासकीय यंत्रणा आणि अनेक संस्थांच्या मदतीने काम करताना कोणी उपाशी राहू नये म्हणून आम्ही धडपडतोय, असं मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर सांगत होते. मराठवाड्यातील किल्लारीच्या भूकंपानंतर पुनर्वसनासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे आणि मिळेल त्या जागेत दोन-तीन तासच झोप घेत पुन्हा कामाला लागणारे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचं जाहीर कौतुक तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलं होतं. आज तेच परदेशी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. याही वेळीही ते तहान-भूक, झोप विसरले आहेत. ब्रेव्हो सर!!
कर्मचाऱ्यांचे पगार लांबलेचएकीकडे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लांबले आहेत. पगार काढणाºया यंत्रणेतील अधिकारीच कामावर नसल्याने अनेक अडचणी आहेत. मार्च पेड इनटू एप्रिलचा पगार अधिकाºयांना ५० टक्के तर कर्मचाºयांना ७५ टक्केच मिळणार आहे. कोरोनाचा मुकाबला करणारे पोलीस दल, आरोग्य सेवेतील कर्मचारीही दोन टप्प्यांच्या सरकारी कचाट्यातून सुटू शकलेले नाहीत. त्यातच आता पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनची भर पडली आहे.