नितीन जगताप
मुंबई : तीस वर्षांपूर्वीची गोष्ट, त्या वेळी एचआयव्हीची भीती होती. त्यातच एचआयव्हीग्रस्त मित्राने आत्महत्या करून जीवन संपवले. एका अवलियाने एचआयव्ही रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्याची सुरुवात रेडलाईट एरियातून वारांगनांची जनजागृती करून केली. एचआयव्हीबाबत माहिती देण्यासाठी या भागात विविध उपक्रम राबविले. काम करीत असताना ७ ते ८ वर्षांच्या मुलीही वेश्याव्यवसायात असल्याचे त्यांना दिसले. हा प्रसंग त्यांच्या जीवाला लागला. त्यानंतर केवळ महिलांची एचआयव्हीबाबत जनजागृती करून चालणार नाही. या चिमुकल्या मुलींनाही यातून बाहेर काढायचे, असा निर्धार त्यांनी केला.
पालिकेच्या शाळेत त्या मुलांचे अॅडमिशन करून देतात. या वर्षी १ली ते ९वीपर्यंतची ४५ मुले आहेत. प्राथमिक शाळेत ९ मुले, १२ मुली तर माध्यमिकमध्ये २१ मुले आणि ३ मुली शिक्षण घेत आहेत. शाळा सुटल्यावर मुलांना आहार दिला जातो. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मुलांचा भायखळा येथील अभ्यासिकेत अभ्यास घेतला जातो. त्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात मुलांचा अभ्यास घेण्यासाठी जागा नव्हती, पैसे नव्हते. त्यामुळे ८ वर्षे त्यांनी कुंटणखाण्यातच मुलांचा अभ्यास घेतला. बोर्ड मेंबरच्या माध्यमातून निधी उभारला. त्यानंतर एका परदेशी नागरिकाने त्यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्री बनवली. त्याला बक्षीस मिळाले. त्यानंतर भारत सरकारने संस्थेला निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या माध्यमातून मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
‘‘मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असताना आर्थिक अडचणी आल्या. पण ‘आर या पार’ असा विचार करून समस्यांना सामोरे गेलो. तसेच कोरोनाच्या काळात मुलांच्या जेवणाचा आणि इतर खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता; पण मी आणि बोर्ड मेंबर यांनी पुढाकार घेऊन पैसे उभारले. त्याला इतर दात्यांनीही मोलाची साथ दिली,’’ असे विनय वस्त सांगतात.
सकाळी मुलांना आम्ही शिक्षण देतो. तेथे मुले व्यवस्थित असतात. पण, रात्री त्यांची आई ग्राहकासोबत असते. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे भिवंडी येथे जागा घेतली असून, या मुलांसाठी आश्रम सुरू करणार आहोत.
विनय वस्त,संचालक, साई स्वयंसेवी संस्था
आम्ही दोघेही एकाच ठिकाणी काम करीत होतो. या प्रवासात काही अडचणी आल्या; पण आम्ही हिमतीने सामोरे गेलो. पूर्वी रेड लाईट एचआयव्हीबाबतची परिस्थिती वेगळी होती. आता त्यात सुधारणा झाली आहे. आता शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. या मुलांमधील काही मुले डॉक्टर, इंजिनीअर झाले आहेत.- विनीता वस्त,विनय वस्त यांच्या पत्नी