मुंबई : एकीकडे तुल्यबळ भाजप-शिवसेना सर्व प्रकारच्या ‘शस्त्रास्त्रांसह’ विधानसभेच्या रणसंग्रामास सज्ज झालेले असताना काँग्रेस पक्षात मात्र ‘दारुगोळा’ कोणी जमवायचा, यावरूनच मतभेद आहेत. हा विषय काढला की सगळे नेते एकमेकांकडे पाहू लागतात अशी अवस्था असल्याचे एका नेत्याने सांगितले.
पक्षाला आलेली मरगळ झटकून पक्ष पुन्हा नव्याने निवडणुकीला सज्ज करण्याची जबाबदारी नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे. मात्र त्यांच्या पदग्रहण समारंभात पहिल्या रांगेत बसण्यावरुन मानापमान नाट्य रंगले होते. पहिल्या रांगेतील खुर्चीवर कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नावाची पाटी लावलेली असताना त्यावर आ. नसीम खान जाऊन बसले. राऊत यांनी आपली नाराजी पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे बोलुन दाखवली. तेव्हा कुठे खरगे यांनी हस्तक्षेप करुन तेथे आणखी एक खूर्ची लावायला लावली. तर मुंबई काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाला येण्याचे सौजन्य दाखवले नाही.
हाताचे चिन्ह छापलेले तिरंगी उपरणे आणि सुताचा हार गळ्यात घालून सर्व नेत्यांचे स्वागत केले गेले पण सगळ्यांनी ते हार आणि उपरणे काढून ठेवले. सगळ्यांना आपल्यापुरते पडलेले आहे, अशी टीकाही एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली. सरकारच्या विरोधात काही बोललो, मोर्चे काढले, आक्रमकपणा दाखवला तर आपली प्रकरणे तर बाहेर निघणार नाहीत ना, ही भीती काही केल्या आमच्या अनेक नेत्यांच्या मनातून अजूनही जायला तयार नाही, आम्ही लढायचे तरी कसे, असा सवाल त्या नेत्याने उपस्थित केला आहे.
मुंबईसाठी तीन कार्याध्यक्ष नेमाप्रदेश काँग्रेसप्रमाणे मुंबईसाठीसुद्धा तीन कार्याध्यक्ष नेमावेत, अशी मागणी मुंबईचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि भाई जगताप यांची नावे सुचविली आहेत. मुंबईत निवडणुकीचा खर्च कोणी करायचा यावरुनही देवरा यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.