कोण एसपी, कुठले कलेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:07 PM2020-04-07T18:07:53+5:302020-04-07T18:08:31+5:30
रस्त्यांवर लॉकडाऊनची कडोकोट नाकाबंदी : पोलिस आणि सरकारी अधिका-यांचीही गय नाही
मुंबई - इस्टर्न एक्स्प्रेस वेवरील एक खासगी वाहन पोलिसांनी सोमवारी दुपारी रोखले. आतून साध्या कपड्यात बसलेल्या व्यक्तीने एसीपी ठाणे असा कडक आवाज दिला. कोण एसीपी आम्ही नाही ओळखत असे उत्तर समोरून आल्यानंतर साहेबांचे पित्त खवळले. गाडी सोड नाही तर बूट काढून मारीन असा दम भरल्यानंतरही बंदोबस्तावरील हवालदार तसूभरही मागे हटला नाही. बराच वाद झाला. पण, एसीपींचे आयकार्ड बघितल्यानंतरच त्यांनी गाडी पुढे सोडली.
लॉकडाऊनचे निर्बंध लोकांना पाळावेत यासाठी जागोजागी उभारलेल्या चेक पोस्टवरील पोलिस दिवसभर अशाच अत्यंत काटेकोर पध्दतीने वाहनांची तपासणी करताना दिसतात. कुणी डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन येतो, तर कुणाला हॉस्पिटलला जायचे असते. कुणाला किराणा घ्यायचा असतो. तर, कुणी मित्राला जेवण द्यायला घराबाहेर पडलेला असतो. असे असंख्य बहाणे सांगणाले लोक चेकपोस्टवर येत असतात. कधी सबुरीने वागणारे पोलिस प्रसंगी अनेकांना प्रसादही देतात. मात्र, दिवसाअखेर ते अक्षरश: हतबल झालेले दिसतात.
शहापुर येथील गोठ्यातील गीर गाईंचे दुध मुंबईतला मोजक्या ठिकाणी विक्री करणा-या व्यावसायीकाने दुधाची ने आण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, दुधासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे आॅनलाईन उत्तर त्यांना आले. मात्र, त्या आधारावर शहापूरला निघालेल्या या व्यापा-याची गाडीही पोलिसांना ठाण्यातील एका चेक पोस्टवर अडवली. कलेक्टर आॅफिसने मला सांगितलंय परवानगीची गरज नाही असे तो व्यापारी सांगत होता. मात्र, कुठला कलेक्टर आम्ही नाही ओळखत. रितसर परवानगी दाखवा तरच पुढे जाता येईल असे पोलिसांनी बजावले. बराच वाद झाला. मात्र, ती गाडी चेकपोस्ट ओलांडून पुढे जाऊ शकली नाही.
माझा मित्र मुंबईला येतोय. त्याची गाडी चेक नाक्यावरून पुढे सोडा असा मुंबईतल्या एका वरिष्ठ अधिका-याचा फोन चेक पोस्टवरील पोलिस अधिका-याला आला. मात्र, मी सोडली तरी पुढे त्याला पुन्हा अडवतीलच असे सांगत ही गाडी पुन्हा माघारी धाडण्यात आली. क्राईम ब्रान्चचे पोलिस काही कामानिमित्त नवी मुंबईच्या दिशेने जात होते. एक गणवेशातलाहवालदार आणि तीन साध्या वेशातले पोलिस गाडीत होते. ही गाडी कळवा नाक्यावरील चेकपोस्टवर रोखण्यात आली. पोलिस असला म्हणून काय झाले एका गाडीत तिघांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही असे खडे बोल सुनावतच हे वाहन पुढे सोडण्यात आले.
. . . .
शिकलेलेच जास्त हूकलेले
कॅडबरी जंक्शन येथील पोस्टवर एक २५ वर्षांचा तरूण मोटरसायकलवरून जात होता. पोलिसांनी त्याला रोखल्यानंतर त्याची बोबडी वळली. मारू नका साहेब. मी मी आयटी इंजिनिअर आहे. मोठ्या कंपनीत नोकरी करतो असे आर्जव तो करत होता. त्यावर या देशात शिलकेलेच जास्त हुकलेले आहेत असा टोला हवालदाराने लगावला आणि तरूणाच्या पार्श्वभागावर एक दंडूका मारून त्याला माघारी धाडले.