आमचे हक्काचे घर चोरले कोणी?, वरळी बीडीडीवासीयांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:02 IST2025-03-06T12:02:03+5:302025-03-06T12:02:44+5:30
टॉवर १ मध्ये ऐनवेळी घरे देण्याबाबत म्हाडा प्रशासनाचा 'यू टर्न', आठ चाळींमधील रहिवासी संतप्त; सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासह ठिकठिकाणी केली बॅनरबाजी

आमचे हक्काचे घर चोरले कोणी?, वरळी बीडीडीवासीयांकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत उभारलेल्या टॉवर १ मध्ये चाळ क्रमांक २१, २९, १२, १३, १४, १५, १६, १७ मधील रहिवाशांना घरे देण्याबाबत म्हाडाने 'यू टर्न' घेतला आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी निषेध म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाबाहेर आणि ठिकठिकाणी 'आमचे घर चोरले कोणी?' अशा आशायाचे बॅनर लावत निषेध व्यक्त केला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ५५० कुटुंबांना नव्या घरात प्रवेश करता यावा, यासाठी म्हाडाने तयारी केली असतानाच दुसरीकडे म्हाडाने शब्द फिरवल्याने संबंधित रहिवासी कमालीचे नाराज झाले आहेत.
वरळीतील १२१ बीडीडी चाळींपैकी २१ चाळी पुनर्विकासांर्तगत पाडल्या आहेत. २१ चाळींमधील एक हजार ६८० कुटुंबांपैकी काही कुटुंबांना संक्रमण शिबिरात घर, तर ज्यांना संक्रमण शिबिरात घर मिळाले नाही, अशांना घरभाडे दिले आहे. १२१ चाळींपैकी चाळ क्रमांक २१ आणि २९ च्या मागे अगदी १५ फुटांना लागून टॉवर क्रमांक एक उभा राहिला आहे. टॉवर एकमधील आठ इमारतींचे काम सुरू असताना, चाळ क्रमांक २१ आणि २९ मधील रहिवाशांना अतोनात त्रास झाला. अनेकदा बांधकाम साहित्याची पडझड झाली, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
घरे सध्या पुनर्विकासांतर्गत टॉवर १ मध्ये ४० मजल्यांच्या आठ इमारती बांधल्या असून, त्यात एकूण २,२६४ घरे आहेत.
बांधकाम साहित्याची पडझड, प्रदूषणाचाही त्रास
नव्या इमारतीच्या बांधकामादरम्यान जलवाहिनी फुटण्यासह निर्माणधीन इमारतीमधून खाली सळई, दगड पडणे, अशा घटनांना रहिवाशांना सामोरे जावे लागले.
बांधकाम सुरू झाल्यापासून २ धुळीच्या प्रदूषणाने रहिवाशांचा श्वास कोंडला. वीजपुरवठा खंडित होण्याच्या अगणित घटना घडल्या आहेत.
आता नवीन घरे देण्याची वेळ आली, तेव्हा आम्हाला डावलण्यात आल्याचा संताप चाळ क्रमांक २१ आणि २९ मधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
ना लॉटरी, ना घर
चाळ क्रमांक २१, २९, १२, १३, १४, १५, १६, १७ मधील रहिवाशांना नव्या इमारतीमध्ये घर दिले जाईल, असा शब्द म्हाडाने २०२१ मध्ये रहिवाशांना दिला होता. प्रत्यक्षात मात्र ना लॉटरी निघाली, ना घर मिळाले, अशी अवस्था या रहिवाशांची झाली आहे.
'नवीन घर आमच्या जागेवरच हवे'
चाळ क्रमांक १२, १३, १४, १५, १६, १७, २९, २१ ची लॉटरी काढलेली नाही. नवीन घर आमच्या जागेवरच पाहिजे. म्हाडाच्या २०२१ च्या प्लॅननुसार, लॉटरी जागेवर झाली पाहिजे, असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
म्हाडाच्या प्लॅनमध्ये २१, २९, १२, १३, १४, १५, १६, १७ मधील रहिवाशांना टॉवर १ मध्ये घर दिले जाईल, असे सुरुवातीलाच नमूद केले आहे. चार वर्षे म्हाडा सतत हेच सांगत होते. मात्र, हा प्लॅन म्हाडाच्या वेबसाइटवरून हटवण्यात आला.
साथीचे आजार, अन् इमारतीला तडे
अनेकवेळा या परिसरात गढूळ तसेच कमी दाबाने पाणी येते. प्रकल्पाच्या ठिकाणी स्वच्छता नाही. त्यामुळे रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदी आजारांना सामोरे जावे लागले आहे. चाळ क्रमांक २१ आणि २९ ला तडे गेले आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे.
प्रकल्प सुरू झाल्यापासून रहिवाशांना वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. गैरसोयींमध्ये वाढ झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.