Join us

शरद पवार की अजित पवार, आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा कोणाला? जाहीर केली भूमिका, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:59 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे, राज्यभरातील काही नेते, तर काही पदाधिकारी अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत, तर काहीजण खासदार शरद पवार यांना पाठिंबा देत आहेत. नाशिक येथील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजुनही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर गेले आहत. या पार्श्वभूमीवर आज आमदार सरोज अहिरे  यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मोठी बातमी! टाटाच्या ग्राहकांना मिळणार स्वस्त वीज; दर ३० टक्क्यांनी होणार कमी 

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, आज अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे मी त्यांच स्वागत करण्यासाठी आले आहे. मी आता मतदारसंघात सगळ्यांशी चर्चा केली आहे.  माझा निर्णय जवळपास झाला आहे. शरद पवार वडिलांसारखे आहेत, तर अजित पवार भावासारखे आहेत. अजितदादांनी भावासारखं प्रेम दिलं, असंही अहिरे म्हणाल्या. 

'माझी द्विधा मनस्थिती होती. माझी ९० टक्के लोकांशी चर्चा केली आहे. देवळाली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मी अजित पवार यांना पाठिंबा देणार आहे, असंही सरोज अहिरे म्हणाल्या. 

२ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आमदार अहिरे यांनी आपला पाठिंबा कोणालाही दर्शवला नव्हता. आपला निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवला होता, आज पहिल्यांदाच त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एका आमदाराची ताकद मिळाली आहे. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.  आमदार काळे गेल्या आठवड्यात विदेशात दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणत्या गटाला असणार अशा चर्चा रंगल्या होत्या. 

अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत २६ हून अधिक आमदारांनी हजेरी लावली होती. यामुळे पवार यांना जास्त पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, तर शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीतही वीसहून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला होता.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा