Join us

कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नाही - लता मंगेशकर

By admin | Published: May 31, 2016 2:47 PM

तन्मय भटच्या व्हिडिओवर लता मंगेशकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 31 - प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणा-या तन्मय भटच्या व्हिडिओवर सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वचजण टीका करत आहेत. या प्रकरणावर स्वत: सचिन तेंडूलकर किंवा लता मंगेशकरांनी अजूनपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अखेर लता मंगेशकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नाही, असे सांगत त्यांनी तन्मयला अनुल्लेखाने मारले आहे.
 
स्पॉटबॉय डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांनी या प्रकरणावर आपले  प्रतिक्रिया दिली आहे. ' मी तो व्हिडिओ अद्याप पाहिलेला नाही, आणि मला तो पहायचाही नाही. मला याबाबतीत कोणत्याच प्रकारचं भाष्य करायचं नाही. तसंही हा तन्मय भट कोण ? मी त्याला ओळखत नाही' असं म्हणत लता मंगेशकर यांनी हा व्हिडीओ व त्यातील कंटेटला महत्व देण टाळलं आहे. 
 
एआयबी कॉमेडी मास्टर तन्मय भट्टनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा अपमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर टीका केली होती. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये सचिन आणि लता मंगेशकर यांच्या शाब्दिक चकमक झडल्याचं दाखवण्यात आलं असून, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आक्षेप घेत टीका केली होती. 
 
या आधीही एआयबीनं अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोअर यांच्याबाबत शिवीगाळ केल्याचं दाखवलं होतं. त्याप्रकरणी एआयबीविरोधात एफआयआर दाखल झाला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांना 'जॉन स्नोही मेला मग तुम्ही कधी मरणार आहात. तुमचा चेहरा आठ दिवस पाण्यात ठेवल्यासारखा दिसतो आहे', असे प्रश्न विचारून अत्यंत हीन भाषेत टीका केली आहे. व्हिडीओवर अनुपम खेर, रितेश देशमुख, सेलिना जेटली आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही सडकून टीका केली आहे. 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मनसेकडून याबाबत तक्रार आली आहे. त्यातून हे सूचित करण्यात आले आहे की, भादंविच्या कलम ५००नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. तथापि, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ही वादग्रस्त पोस्ट टिष्ट्वटर आणि फेसबुकवरून हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या तपासानुसार हे प्रकरण भादंविच्या कलम ५०० नुसार मानहानीचे आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे आम्ही भट यास चौकशीसाठी तत्काळ बोलविणार नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या अधिनियमानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाउ शकतो का? याचीही चाचपणी सुरु आहे.