"बिल्डरांना १२,००० कोटींचा प्रिमीयम कुणी माफ केला?"; भाजपाचा ठाकरेंना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 08:24 AM2023-12-17T08:24:19+5:302023-12-17T08:52:12+5:30
शिवसेनेच्या या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
मुंबई - जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, ह्या प्रकल्पाचं काम अदानी उद्योग समुहाला देण्यात आलं आहे. त्यावरुन भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आला आहे. शिवसेनाउद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पास विरोध दर्शवला असून स्वत: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला. भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी असल्याची घणाघाती टीका करत उद्धव ठाकरेंनी हे सरकार बिल्डरधार्जीणं असल्याचं म्हटलं.
शिवसेनेच्या या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामुळे, भाजपा नेत्यांनीही या मोर्चाआडून होत असलेल्या राजकाणावर भाष्य करत शिवसेना (उबाठा) आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनीच बिल्डरांचे हजारो कोटी माफ केल्याचा दावाही भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील धारावी टी जंक्शनपासून उद्धव ठाकरेंचा मोर्चा सुरू होऊन उद्योगपती गौतम अदानींच्या कार्यालयापर्यंत पोहोचला. शेलार यांनी टी-जंक्शनचा उल्लेख करत उद्दव ठाकरे म्हणजे यु-टर्न (UT) असल्याचं म्हटलं. एकदा "ठाकरे डिमांड रुपया" (TDR) त्यांना मिळाला की मोर्चातून "यु टर्न" घेण्याचा मार्ग मोकळा, असे म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर प्रतिहल्ला केला आहे.
उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यु टर्न... आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येक वेळी यु टर्न घेतलेत....
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 16, 2023
आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे.
"यु टर्न फेम" श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही "टि जंक्शन" वरूनच...
म्हणजे…
उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यु टर्न, आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येक वेळी यु टर्न घेतले आहेत. आता, त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. "यु टर्न फेम" श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही "टी जंक्शन" वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच. एकदा "ठाकरे डिमांड रुपया" (TDR) त्यांना मिळाला की "यु टर्न" घेण्याचा मार्ग मोकळा!, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा. बघा घेतला का यु टर्न?. कोविडमध्ये बिल्डरांना १२ हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला?, असा सवाल शेलार यांनी विचारला. तसेच, मुंबईकर हो!
धारावीकरांचा यांना पुळका जोरात... खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात?, अशी बोचरी टीकाही शेलार यांनी केली.
नारायण राणेंनीही केला पलटवार
ठाकरेंचा हा मोर्चा केवळ राजकीय हेतुने आणि आर्थिक लाभासाठी असल्याचा आरोपही शिवसेनेवर होत आहे. विरोधकांकडून या मोर्चावरुन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही ट्विटरवरुन धारावी पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केलीय. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात धारावीकरांना उध्दव ठाकरे पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. आता त्यासाठी मोर्चा काढत आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षात तुम्ही का नाही दिले धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर?, असा प्रश्न राणेंनी विचारला आहे. तसेच, यांचे प्रेम धारावी आणि धारावीकरांवर नाही. यांचे खरे प्रेम टी.डी.आर. च्या मलईवर आहे. उध्दव ठाकरे यांना ना नीती, ना नितीमत्ता, स्वार्थासाठी काही पण... असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.