Join us

रात्री १२ नंतर रस्त्यावर फिरतात तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:07 AM

मुंबई : शहरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरी, दरोडे या घटनांमुळे सामान्य माणूस त्रासला आहे. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांमुळेदेखील आता ...

मुंबई : शहरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरी, दरोडे या घटनांमुळे सामान्य माणूस त्रासला आहे. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांमुळेदेखील आता सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेकदा रात्री १२ नंतरदेखील शहरातील अनेक रस्त्यांवर काही जण फिरताना दिसून येतात. हे फिरणारे लोक नक्की कोण आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होतो. रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात येते. रात्रीच्या वेळेस गस्त घालून कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक ठिकाणी झाडाझडतीदेखील घेण्यात येते.

शहरात रात्रीची गस्त

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यात पाचही प्रादेशिक विभागांचे अप्पर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळांचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. यादरम्यान मुंबईत १३६ ठिकाणी नाकाबंदी करत ९ हजार १४५ वाहनांची तपासणी करण्यात आली.

किती जणांवर कारवाई?

मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार ६१५ जणांवर कारवाई करण्यात आली. यात ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत ५ वाहनांचा समावेश आहे. २२२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील १०८४ आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये २६७ आरोपी मिळून आले. तसेच ९४६ हॉटेल, लॉज, मुसाफीरखान्याची झाडाझडती घेण्यात आली.

पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त

शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस गुन्हेगार अनेकदा सक्रिय होतात. या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची प्रत्येक मिनिटाला व्हॅनमधून अथवा बाइकवरून गस्त सुरू असते. पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असल्यानेच आपल्याला सुरक्षित झोप लागते.

स्टार ११९६