मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या तोडक कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद झाला. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात काही दिवसांपूर्वी जोरदार वाकयुद्ध रंगले होते. दरम्यान, कंगनाने मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनावर कारवाई करत तिच्या कार्यालयातील अनधिकृत बांधाकाम पाडले होते. ही कारवाई सुरू असतानाच कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कंगना राणौतच्या वकिलांना बीएमसीच्या कारवाईशी संबंधित फाईल आणि संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतींच्या क्लीप घेऊन येण्यास सांगितले. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयात झालेल्या कारवाईबाबत बीएमसीच्या वकिलांनी सांगितले की, कंगना सांगते की ही सर्व कारवाई त्यांच्या ५ सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमुळे झाली आहे. मग ते ट्विट नेमकं काय होतं, हे न्यायालयासमोर सादर झालं पाहिजे, ज्यामुळे टायमिंगची माहिती मिळू शकेल.त्यानंतर कंगनाच्या वकिलांनी यावर सांगितले की, कंगनाने सरकारविरोधात काही विधाने केली होती. तिच्या एका ट्विटवर संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच कंगनाला धडा शिकवला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, कंगनाचे वकील बीरेंद्र सराफ यांनी संजय राऊत यांनी हरामखोर शब्दाचा उच्चार केलेली व्हिडीओ क्लीपसुद्धा न्यायालयात सादर केली.त्यानंतर संजय राऊत यांच्या वकिलांनी माझ्या अशिलाने कुणाचेही नाव घेतलेले नाही. असे सांगत बचाव केला. त्यावर न्यायालयाने जर राऊत यांनी हा शब्द कंगनासाठी वापरला नव्हता तर आम्ही हे विधान रेकॉर्ड करू शकतो का असा सवाल राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांना केला. तेव्हा थोरात यांनी आपण याबाबत उद्या प्रतिज्ञापत्र सादर करू असे सांगितले.दरम्यान, संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतींच्या चित्रफिती न्यायालयात सादर केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राऊत हे आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख करत आहेत. तर दुसऱ्यामध्ये त्याचा अर्थ सांगत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणारून कंगना राणौत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये बऱ्याच काळापासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनाने अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बीएमसीने तिच्या कार्यालयात अवैध बांधकाम झाल्याची नोटिस देऊन दुसऱ्याच दिवशी तिचे कार्यालय तोडले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी