चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता? तेव्हा त्यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल
By मनोहर कुंभेजकर | Published: June 28, 2023 06:07 PM2023-06-28T18:07:58+5:302023-06-28T18:08:26+5:30
चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई करताना देखील बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण तेव्हा कुठल्या नेत्याने निषेध व्यक्त केला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबूरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे.
चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई करताना देखील बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण तेव्हा कुठल्या नेत्याने निषेध व्यक्त केला नाही. उलट या शाखेवर कारवाई करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव होता, अशीही माहिती आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आता वांद्रे येथील शाखेवर कारवाई करताना गळा काढणाऱ्या उबाठा पक्षातील नेत्यांनी चेंबूरच्या शाखेवर कारवाई करताना झालेल्या अवमानाची देखील दखल घ्यायला हवी होती, असे शेवाळे म्हणाले. याच वर्षी दि, १८ एप्रिल रोजी चेंबूर येथील सिंधी वसाहतीतील शिवसेनेच्या १५४ क्रमांकाच्या शाखेवर पालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली.