Join us

निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 6:19 AM

या पदावरील नियुक्तीवरून महायुतीतील तीन पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही आयुक्तपद रिक्त राहिलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका-नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तपद मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून रिक्त आहे. राज्य निवडणूक आयुक्तपदावर असलेल्या यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर २०२४ रोजी संपला आहे, त्यानंतर सरकारने या पदावर नियुक्ती न केल्याने तेव्हापासून हे पद रिक्त आहे. 

यू. पी. एस. मदान यांचा निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार संपण्याच्या काळात या पदासाठी अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. यात नितीन करीर, माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांची नावे होती. उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करीर यांच्या नावाला अजित पवारांचा विरोध होता, तर मनोज सौनिक यांनी निवडणूक आयुक्तपदासाठी अर्ज केला होता, पण त्यांची नियुक्ती महारेराच्या अध्यक्षपदी करण्यात आली. तर सुजाता सौनिक यांनी या पदावर जाण्यास नकार दिल्याचे समजते. 

या पदावरील नियुक्तीवरून महायुतीतील तीन पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही आयुक्तपद रिक्त राहिलेले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतही फाईल स्वाक्षरीसाठी गेली आहे, मात्र अद्याप त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४महायुतीराज्य सरकारनिवडणूक 2024